Pandharpur well collapse accident news
पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : आंबे (ता. पंढरपूर) येथे शेतामध्ये विहीर खोदण्याचे काम सुरू असताना माती आणि दगडांचा मोठा भराव अचानक कोसळून चार कामगारांचा मृत्यू झाला. आज (दि.१५नोव्हेंबर) सकाळी दहा वाजता ही दुर्घटना घडली.
आंबे गावातील एका शेतामध्ये विहीर खोदण्याचे काम सुरू होते. विहिरीचे काम पूर्ण होऊन मोजमाप करण्याचे काम सुरू होते. विहिरीत उतरलेल्या चार कामगारांच्या अंगावर अचानक माती आणि दगडांचा मोठा ढिगारा कोसळला. काही क्षणांतच ते माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या अनपेक्षित दुर्घटनेमुळे घटनास्थळी एकच धावपळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतील माती आणि दगडांचा भराव बाजूला करून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले.
दुर्घटनेत चारही कामगारांचा जागीच मृत्यू झाला. मंगेश गोविंद मोरे (वय ४५), सिद्धेश्वर दत्तू घोडके (वय ४५, दोघे रा. रांझणी, ता. पंढरपूर), तानाजी नाना घोडके (वय ५१), आबा भिवा घोडके (दोघे रा. अनवली, ता. पंढरपूर) अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत.
मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कामगारांचा कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सचिन लंगुटे, नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी घटनास्थळी भेट दिली. या दुर्घटनेबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.