

सोलापूर : कॉरिडॉरसाठी पंढरपूर येथे बाधित दुकानदारांना पर्यायी दुकान, बाधित होणाऱ्या ४५० हून अधिक घरांतील नागरिकांना योग्य पर्याय उपलब्ध करून देत नियोजन केले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर निवासी संकुल उभे केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
बाधितांसाठी मंदिरापासून सव्वा किलोमीटर अंतरावर एकतीस हजार तीनशे चौरस मीटर इतकी जागा असून, यात २८ हजार चौरस मीटर जागेवर घरे बांधून दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे बाधितांना घर आणि दुकान बांधून पूर्ण होईपर्यंत तीन वर्षे घर आणि दुकानाचे भाडेदेखील राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे. त्यासाठी विशेष पुनर्वसन पॅकेजला मान्यता दिल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पंढरपूरमधील जमीन व मालमत्ता अधिग्रहणासाठी देण्यात येणारा मोबदला हा थेट मुंबईतील दरांच्या धर्तीवर देण्यात आला आहे. पंढरपूरमधील जुनी मंदिरे आणि मठ यांचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांना आहे त्याच ठिकाणी ठेवून त्यांचा विकास केला जाणार आहे. कोणतेही मंदिर किंवा मठ स्थलांतरित केले जाणार नाहीत. बाधितांचे योग्य पुनर्वसन करून जागेस जागा देण्याचे शासनाचे धोरण आहे. विकास आराखड्यामुळे बाधित होणारे दुकानदार, रहिवासी आणि इतर व्यावसायिक यांच्या पुनर्वसनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.