Shri Vitthal Rukmini Temple Staff
पंढरपूर : शशिकांत पाटील यांनी मंदिर कर्मचार्‍यांची माफी मागितल्याने आंदोलन स्थगित केले.  Pudhari News Network
सोलापूर

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कर्मचार्‍यांचे आंदोलन स्थगित

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी अनंता रोपळकर यांना बुधवारी (दि.३) श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी शिवीगाळ केली होती. याबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी आज (दि.४) सकाळी १० पासून काम बंद आंदोलन सुरु केले होते. मात्र, शशिकांत पाटील यांनी आंदोलनस्थळी येवून कर्मचार्‍यांची माफी मागितल्याने आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

शशिकांत पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन माफी मागितली.

शशिकांत पाटील यांना श्री विठ्ठल रुक्मिणीने चांगली सद्गबुध्दी द्यावी. घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच शशिकांत पाटील यांनी कर्मचार्‍यांची माफी मागावी, अशी मागणी करता आज सर्व कामकाज बंद ठेवून आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाची दखल घेवून मनसे नेते शशिकांत पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन माफी मागितली. असा प्रकार पुन्हा घडणार नाही. आषाढी वारीच्या तोंडावर कामबंद आंदोलन करु नये, अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर कर्मचार्‍यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

अशा घटनांमुळे कर्मचार्‍यांचे खच्चीकरण

दरम्यान, मंदिर समितीचे कर्मचारी नेमून दिलेले कर्तव्य सेवाभावी वृतीने व जबाबदारीने पार पाडत आहेत. परंतू, अशा घटनांमुळे प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणार्‍या कर्मचार्‍यांचे खच्चीकरण होत असल्याची भावना कर्मचार्‍यांची असल्याचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सांगितले.

मंदिर समितीचे कर्मचारी भक्तनिवास येथे काम करत असताना शिवीगाळीचा प्रकार घडला आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन सुरु केले. मात्र, आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती संख्या पाहता आंदोलन सुरु ठेवणे योग्य नाही. म्हणून मनसे नेते शशिकांत पाटील यांना बोलावून घेतले. आणि त्यांनी या प्रकाराची माफी मागितली आहे. त्यामुळे हे आंदोलन स्थगित केले आहे. - ह. भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष मंदिर समिती
SCROLL FOR NEXT