सोलापूर

सोलापूर : मोहोळ तालुक्‍याला वादळी पावसाचा तडाखा; पिके, बागा भुईसपाट, घरांचे नुकसान, विद्‍युत खांब, जनित्र कोसळले

निलेश पोतदार

मोहोळ : पुढारी वृत्तसेवा मोहोळ तालुक्यात सर्वत्र मेघगर्जनेसह तुफान वादळीवाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचने सलग दुसऱ्या दिवशीही हजेरी लावली. या पावसाने शेतातील पिके, बागा , विजेचे खांब भुईसपाट झाले आहेत. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेल्याने घरांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी लोक जखमी झाले आहेत. केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. काही ठिकाणी विजा पडल्याने झाडांनी पेट घेतल्‍याच्या घटनाही समोर आल्‍या आहेत. अनेक ठिकाणी विजेचे खांब, विद्युत जनित्र कोसळले विजेच्या तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.

मोहोळ तालुक्यात मोहोळ शहरासह ग्रामीण भागातील खंडाळी पापरी कोन्हेरी, हिवरे, पेनूर, पाटकूल, टाकळी सिकंदर, कुरूल, कामती, शेजबाभूळगाव, सय्यद वरवडे नजिक पिंपरी, वाळूज, भैरववाडी, देगाव, नरखेड मनगोळी, बोपले तसेच वडवळ ढोकबाभूळगाव, गोटेवाडी, रामहिंगणी, आष्टे, खुनेश्वर भांबेवाडी भोयरे घाटणे डिकसळ मसलेचौधरी, लांबोटी, शिरापूर, पोफळी यासह सर्वत्र मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचा तडाखा बसला. पाऊस कमी पण वादळी वाऱ्याने शेतीसह घरांचे बागांचे व वीज वितरण कंपनीचे खांब विद्यूत जनित्र तारा तुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याचा सर्वाधीक फटका खंडाळी पापरी परिसराला बसला आहे. खंडाळी येथे वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली तर अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले.

डिकसळ येथील दत्तात्रय त्रिबंक धावणे यांच्या घरावरील सर्व पत्रे उडून गेले. खंडाळी येथील उत्तम मुळे यांच्या घराजवळील चिंचेचे झाड म्हशीच्या अंगावर पडून म्हैस दगावली आहे. पापरी येथील अंकुश भोसले, तात्यासाहेब भोसले, साहेबराव भोसले, समाधान सावंत, विठ्ठल भोसले यांच्या घरावर पत्रे, तर शाहू भोसले यांची केळीची बाग भुईसपाट झाली. खवणी येथे श्री बिरोबा मंदिराच्या शिखरावर विजेचा स्पर्श झाल्याने शिखरास भेगा पडल्या. वादळी वाऱ्याचा वेग एवढा भयानक होता की, होणाऱ्या नुकसानीकडे हतबल होऊन पाहत बसण्यापलिकडे शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हाती काहीच नव्हते.

देगाव (वा) व वाळूज (दे) परिसरात वादळी वाऱ्यामुळे वस्तीवरील तसेच गावातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. झाडे उन्मळून पडून भरपूर नुकसान झाले आहे. पत्रे उडाले आहेत, जनावरे जखमी झाली आहेत, महादेव दगडु कादे यांची सात वर्षाची लिंबूनी बागेतील सुमारे १५० झाडे उद्ध्वस्त झाली आहेत. समाधान आतकरे यांच्या वस्तीवरील कडबा गंजी उडून गेल्या आहेत. भैरववाडी येथील बालाजी पाटील यांच्या शेतातील विजेचा डिपी वादळी वाऱ्याने खाली कोसळला.

नुकसानीचे सर्वेक्षण करून त्वरीत पंचनाने करण्याची मागणी :

मोहोळ तालुक्यात सलग दोन दिवस अवकाळी व वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने त्वरीत पंचनाने करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT