मोहोळ : तालुक्यातील न्यायालयीन कोठडीसाठी वापरण्यात येणारे दुय्यम कारागृह अखेर शासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले आहे. कारागृहातील आरोपींना २ जुलै रोजी कोल्हापूर येथील कारागृहात पाठवण्यात आले आहे. यापुढील कैद्यांचा सुध्दा मुक्काम आता कोल्हापूर कारागृहातच होणार आहे.
राज्यातील अनेक दुय्यम कारागृहाची दुरवस्था झाल्याने कैदी पळून जाण्याचे प्रमाण पाहता राज्य शासनाने दुय्यम कारागृह बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसारच मोहोळ कारागृहातील आरोपींना सुध्दा दोन जुलै रोजी कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे. मोहोळ येथील कारागृहात विविध गुन्ह्यांतील २२ कैदी होते. यामध्ये १८ पुरुष तर ४ महिलांचा समावेश आहे. या सर्व कैद्यांची २ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस वाहनांच्या ताफ्यातून कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोहोळ पोलीसांकडून कारागृहाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण स्थलांतर प्रक्रिया शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली. सर्व कैद्यांना कोल्हापूर येथे घेऊन जात असताना नातेवाईकांनी निरोप देत अश्रुंना वाट मोकळी करून दिली.