साखर उतार्‍यात पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आघाडीवर 
सोलापूर

Kolhapur Sugar Mill : साखर उतार्‍यात पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आघाडीवर

राज्यात 27.83 लाख मेट्रिक टन नवे साखर उत्पादन

पुढारी वृत्तसेवा

संगमेश जेऊरे

सोलापूर : ऊस गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटून गेला असून, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक उतारा कोल्हापूर विभागाचा आहे. निव्वळ साखर उतारा ही 9.65 इतके असून, तुलनेने सर्वाधिक साखर कारखाना असलेल्या सोलापूर जिल्ह्यात मात्र सरासरी उताराही 9 टक्क्याच्या खाली आहे.

राज्यात 91 सहकारी आणि 93 खासगी मिळून 184 साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू आहे. यामध्ये 80 लाख मेट्रिक टनाइतके सर्वाधिक ऊस गाळप पूर्ण करून पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. 77.98 लाख मेट्रिक टन गाळपासह कोल्हापूर विभाग ऊस गाळपात दुसर्‍यास्थानी आहे. विशेष म्हणजे 9.65 टक्क्यांइतका सर्वाधिक निव्वळ साखर उतारा कोल्हापूरचा असून, या विभागाने सर्वाधिक 74.88 लाख क्विंटलइतके साखरेचे उत्पादन केले आहे.

राज्यात सद्यस्थितीत 336 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे. तर 8.27 टक्के निव्वळ साखर उतार्‍यानुसार राज्यात 27 लाख 83 हजार मेट्रिक टन नवे साखर उत्पादन तयार झालेले असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली. गतवर्षी याचदिवशी 117 लाख 33 हजार मेट्रिक टन ऊस गाळप आणि 7.89 टक्के निव्वळ उतार्‍यानुसार राज्यात 13.99 लाख मेट्रिक टनाइतके साखर उत्पादन तयार झाले होते. याचा विचार करता चालूवर्षी दुप्पट ऊस गाळप व साखर उत्पादन हाती आले आहे. पुणे विभागात 29 कारखाने सुरू असून, त्यांची दैनिक गाळप क्षमता 2 लाख 6 हजार 950 मेट्रिक टन आहे. तुलनेने कोल्हापूर विभागातील 35 कारखान्यांकडून दैनिक 2 लाख 33 हजार 850 मे. टनाइतके ऊस गाळप सुरू आहे. त्यामुळे ऊस गाळपात कोल्हापूर विभाग थोडा मागे असला तरी लवकरच पुणे विभागास मागे टाकण्याची दाट शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यात उतारा घटण्याची कारणे

सध्या सोलापूर जिल्ह्यात सहकारीसह खासगी असे मिळून 40 हून अधिक साखर कारखान्यांने गाळप सुरू केली आहे. ऊस पळवापळवीची स्पर्धा असल्याने उसाची परिपक्वता न तपासता गाळप सुरू केले आहे. ज्यांच्याकडे ऊसतोड टोळी, ऊस वाहतूक वाहन उपलब्ध आहेत. अशा ऊस उत्पादकांच्या 265 जातीचे 7 ते 8 महिन्याचे ऊसही गाळपाला नेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिपक्व 86032, परिपक्व 265 सह अन्य उसाचा उतारा चांगला असून, परिपक्व ऊस तोडले जात नसल्याने त्याचा ऊस उतार्‍यावर बसत आहे. परिणामी ऊसदर कमी घेण्याची वेळ येत आहे. याउलट कोल्हापूर ऊसतोडीचे नियोजन कार्यक्रम नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करत करतात. त्यामुळे त्यांचा उतारा चांगला मिळतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT