

लासलगाव ( नाशिक ) : पिंपळगाव निपाणी (ता. निफाड) येथील केजीएस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेड या साखर कारखान्याच्या पहिल्या गाळप हंगामाचा शुभारंभ रविवारी (दि.14) रोजी करण्यात आला.
लासलगावचे कृषी उद्योजक संजय चांगदेवराव होळकर यांच्या ग्रेनाँच इंडस्ट्रीज समूहाने ऑक्टोबरमध्ये हा कारखाना एनसीएलटीमार्फत विकत घेत सहा वर्षांहून अधिक काळ बंद असलेले कामकाज पुन्हा सुरू केले.
रविवारी सकाळी १० वाजता चेअरमन संजय होळकर, वैशाली होळकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करत झाली. यावेळी श्री सत्यनारायण आणि काटा पूजन करण्यात आले. नाफेडचे माजी अध्यक्ष चांगदेवराव होळकर, चेअरमन संजय होळकर यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी व संचालक मंडळाच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची पहिली मोळी टाकून गाळप सुरू झाले. उसाच्या पहिल्या गाडीला झेंडा दाखवत श्रीफळ वाढवत नवीन हंगामाची सुरुवात करण्यात आली. कारखान्याने यंदा ४ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावेळी चेअरमन होळकर म्हणाले की, ऊस हे हमीभाव देणारे पीक असल्याने शेतकऱ्यांच्या कारखान्याकडून मोठ्या अपेक्षा आहे. शेतकऱ्यांचे हित जपत, नवीन व्यवस्थापनाने मागील थकीत असलेल्या ७७६ ऊस उत्पादकांची साडेसहा कोटी रुपयांची रक्कम तीन टप्प्यांत अदा केली. ज्यामुळे बुडीत रक्कमच नव्हे तर ऊस वाहतूक आणि इतर देणी देखील पूर्ण झाली. आम्ही विश्वास निर्माण केला आहे आणि पुढेही तो कायम ठेवू असे विधान त्यांनी केले. सोहळ्यास नाफेडचे माजी अध्यक्ष चांगदेवराव होळकर, सोनिया होळकर, सत्यजित होळकर, प्रकाश दायमा, कार्यकारी संचालक आदित्य होळकर, जनरल मॅनेजर सुखदेव शेटे, जनरल मॅनेजर घोरपडे, वसंत शिंदे, शेतकी अधिकारी पटेल, डॉ. वसंत शिंदे, निरंजन होळकर आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.