Holi 2026 Pudhari
सोलापूर

Holika Dahan 2026: होलिकादहन कधी करावे, ग्रहणाचे शुभफल कोणत्या राशीला? पंचागकर्तें दातेंनी दिली माहिती

holi 2026 chandra grahan: सूर्यास्तानंतर ग्रहणाचे पर्वकाल, वेधकाळातील पूजन, अभिषेक आणि रंग खेळण्याच्या मार्गदर्शक सूचना; राशीनुसार ग्रहणाचे शुभ-अशुभ फल देखील वाचा!

पुढारी वृत्तसेवा

holi 2026 chandra grahan information in marathi

सोलापूर: भद्रा असतानाही सूर्यास्तानंतर प्रदोषकाळात सोमवारी (दि. २) होलिकादहन करावे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. ३) धूलिवंदनदिनी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असून, दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी ग्रहण सुरू होत आहे. मात्र, भारतात कोठेही या ग्रहणाचा आरंभ आणि मध्य दिसणार नाही. भारतात सर्वत्र हे ग्रहण ग्रस्तोदित स्वरूपाचे असणार आहे. (म्हणजेच ग्रहण लागलेले चंद्रबिंब उदयास येईल) सायंकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी ग्रहण मोक्ष होणार आहे, म्हणजेच ग्रहण संपेल, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.

ग्रहणाविषयी अधिक माहिती देताना, पंचांगकर्ते दाते म्हणाले, मंगळवारी सूर्योदयापासून वेधकाळ सुरू होत आहे. आजारी व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, लहान मुले, म्हातारी माणसे यांनी सकाळी ११ पासून वेध पाळावेत. वेधकाळात पौर्णिमेचा कुळधर्म, पूजाअर्चा, अभिषेक करता येईल. देवाला नैवेद्य दाखविता येईल. वेधामध्ये पूजन निषेध नाही. आपणास भोजन निषेध असल्याने नैवेद्य अगदी थोडा करावा.

धुळवडीला ग्रहणाच्या वेधकाळात रंग खेळावे का?

आपण प्रसाद म्हणून अभिषेकाचे तीर्थ घेऊ शकता किंवा एक घास अन्नाचा फक्त वास घेऊ शकता. गुरुजी किंवा सुवासिनी यांना कोरडा शिधा व दक्षिणा देऊन कुळधर्म करता येईल. तसेच, श्राद्धदेखील सपिंडक करता येईल, त्यावेळेसदेखील श्राद्धाचा स्वयंपाक नैवेद्यापुरता करून नंतर तो गायीला द्यावा. ब्राह्मणास शिधा व दक्षिणा देणे. अशा प्रकारची कर्मे करता येत असल्याने मंगळवारी (दि. ३) वेधकाळात धूलिवंदन (धुळवड), रंग खेळणे हेदेखील करता येईल.

आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून सायंकाळी ६ वाजून ४८ मिनिटांपर्यंत ग्रहणाचा पर्वकाल आहे. काही ठिकाणी अगदी थोडावेळ पर्वकाल असल्याने त्यांनी ६ वाजून ४८ मिनिटांनंतर फक्त मोक्षस्नान करावे. ज्यांना १५-२० मिनिटांपेक्षा अधिक पर्वकाळ मिळत आहे, त्यांना सूर्यास्तानंतर स्नान करून थोडावेळ जप करून सहा वाजून ४८ मिनिटांनंतर मोक्षस्नान करता येईल. त्यानंतर भोजन करता येईल.

राशीनुसार ग्रहणाचे फल

ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन, तूळ, वृश्चिक, मीन या राशींना या ग्रहणाचे शुभफल मिळेल, मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना ग्रहणाचे मिश्रफल मिळेल. वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना ग्रहणाचे अनिष्ट फल मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT