

सोलापूर ःकार्यालयाजवळ चारचाकी गाडी लावण्याच्या कारणावरून शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाप्रमुखांनी सिनेस्टाईल हाणामारी करीत गाडी फोडली असून, त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राजकीय पक्षाच्या नेत्याने किरकोळ कारणावरून एवढा गोंधळ घातल्याने परिसरात चर्चा सुरू आहे.
बेगम पेठ परिसरात शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख मुस्ताक शेख यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या पाठीमागे अफसर शेख हे कुटुंबासह राहतात. बुधवारी (दि.25) दुपारी अफसर यांनी त्यांची चारचाकी गाडी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत लावली. यावरुन मुस्तात शेख आणि अफसर शेख यांच्यात वाद झाला. त्यानंतर मुस्ताक शेख यांनी अफसर यांची गाडी फोडली. गाडीच्या सगळ्या काचा फोडल्या. गाडी फोडतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. दरम्यान मुस्ताक शेख यांची या भागात दादागिरी असून येण्याजाण्याचा रस्ता अडवून ते गुंडगिरी करतात. त्यांच्यावर कारवाई करावी करावी अशी मागणी तेथील महिलांनी माध्यमांसमोर केली. याबाबत बुधवारी रात्री उशीरापर्यंत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.