

सोलापूर ः एपस्टीन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आहे. त्या दबावातून भारत-अमेरिका व्यापार करार झाला आहे. हा करार देशातील शेतकरी आणि जनतेचे नुकसान करणार असल्याने शहर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन समोर बुधवारी (दि.25) आंदोलन केले. यावेळी नरेंदर सरेंडर, देशद्रोही नरेंद्र मोदी मुर्दाबाद, देशद्रोही भाजप सरकार मुर्दाबाद, शेतकरीद्रोही, टेक्सटाईलद्रोही मोदी मुर्दाबाद, राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.
एपस्टीन फाईल्समध्ये पंतप्रधान मोदी यांचे नाव समोर आल्यानंतर अमेरिकेच्या दबावाखाली देशहिताशी पंतप्रधान मोदींनी तडजोड केली. या करारामुळे कापूस, सोयाबीनसह इतर शेतीमालास कवडीमोल भाव मिळणार आहे. त्यामुळे हा करार रद्द करावा, लोकशाहीचा आवाज दाबण्याचा भाजपाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे, तो बंद करावा. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालण्याची धमकी, काँग्रेस नेते हणमंत पवार यांना मारहाण, धमकी देणाऱ्यांना भाजप नेत्यांकडून मूकसंमती देण्यात येत असल्याचा दावा करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, नगरसेवक नरसिंह आसादे, प्रदेश सचिव राहुल वर्धा, श्रीशैल रणधीरे, प्रमिला तूपलवंडे, हनुमंत सायबोळु, उदयशंकर चाकोते, बाबुराव म्हेत्रे, तिरुपती परकीपंडला, विवेक कन्ना, सुभाष वाघमारे, पशुपती माशाळ, सिद्धाराम चाकोते, हारुण शेख, विश्वनाथ साबळे, मैनुद्दीन शेख, राजन कामत, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, गिरीधर थोरात, लखन गायकवाड, शिवशंकर अंजनाळकर, संजय गायकवाड उपस्थित होते.