Police Caught Thief
करमाळा: येथील देवीचा माळ येथील कमलाई देवी मंदिरातील उत्सव मुर्तीच्या दागिन्याची चोरी करणा-याला करमाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून २४ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मणीमंगळसुत्र जप्त केले आहेत. सागर बाळू राऊत, वय ३१ वर्षे, रा. कुंकुगल्ली, करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर असे अटक करून मंगळसूत्र जप्त करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
ही चोरी दि. २२/०८/२०२५ सायंकाळी ०५/०० वा. ते दि. २३/०८/२०२५ रोजी पहाटे ०५/३० वा. चे दरम्यान झाली होती.याची फिर्याद मंदिराचे पुजारी रोहीत महादेव पुजारी, वय २२ वर्षे रा. देवीचा माळ, करमाळा ता. करमाळा जि. सोलापूर यांनी करमाळा पोलिसात दिली होती.
रोहित पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मौजे देवीचा माळ येथील कमला भवानीच्या मंदिरातून कमलाभवानी उत्सव मुर्तीचे गळयातील २४ हजार रु. किंमतीचे दोन वाट्या असलेले व त्याला चार मणी असलेले सोन्याचे अंदाजे २.४ ग्रॅम वजनाचे मनी मंगळसुत्र हे कोणीतरी अज्ञात चोरटयाने मुददाम लबाडीने चोरुन नेले होते. या बाबत करमाळा पोलीस ठाणेस गुरनं. ६९५/२०२५ बी एन एस कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत पथक नेमून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाआधारे सदरचा गुन्हा हा पकडलेल्या आरोपीने केल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले.
त्यानंतर सदर आरोपीस अटक करून कसून चौकशी केली असता त्याने सदर सोन्याच्या दागिन्याची चोरी केल्याची कबूली देऊन २४ हजार रूपये किंमतीचे वरील वर्णनाचे सोन्याचे दागिने काढून दिले. ही कामगिरी हवालदार अजित उबाळे, मनिष पवार, वैभव ठेंगल, रविराज गटकुळ, मिलींद दहीहांडे, अर्जुन गोसावी, योगेश येवले ,राहुल भराटे, अमोल रंदिल, गणेश खोटे तसेच सायबर पो ठाणेचे व्यंकटेश मोरे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास हवालदार ए.एस. मोहोळकर हे करत आहेत.