सोलापूर

आधी पोटभरुन खा… नंतर बिलाचं बघा ! : गवळ्याप्पांचं हॉटेलच अफलातून

अविनाश सुतार

सोलापूर : जगन्नाथ हुक्केरी : व्यवसाय कोणता का असेना, तो नफ्यासाठी चालवला जातो. 'ना नफा, ना तोटा' असे ब्रीद मिरवत सुरू असलेले जगातील बहुतांशजण धंद्यात फायद्यासाठी केसाने गळाही कापतात. मात्र कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागात (गडीभागात) असलेल्या शावळ (ता. अक्‍कलकोट) येथील गवळ्याप्पा महाराजांचे हॉटेल मात्र अफलातून आहे. हॉटेलमध्ये येणार्‍या प्रत्येकाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते. तेव्हा कानावर आधी शब्द पडतो, 'काहीही खा.. पोटभर खा… नंतर बिलाचं बघा' हे वाक्य ऐकून सगळ्यांनाच आश्‍चर्य वाटते. खरं आहे ना शावळमधील जगावेगळी माणुसकी. यात कुठे आहे का नफा आणि व्यवसाय. दिवसभर २०० जणांना नाष्टा, चहा मोफत देतात.

विशेष म्हणजे गवळ्याप्पांच्या हॉटेलमध्ये डायरीही नाही. उधारीच्या नोंदी चक्‍क मांडल्या जात नाहीत. ते जुन्या काळातील आहेत. त्यामुळे त्यांचा खवय्यांवर आणि खवय्यांचा त्यांच्यावर विश्‍वास असेलही. पण आता त्यांचा हा व्यवसाय त्यांचा मुलगा शंकरलिंग चालवतोय. वडिलांसोबतही तोही असतो. त्यांनाही डायरी ठेवावी आणि उधारी मांडावी, असे वाटत नाही, हे विशेष आहे. सकाळी सहा ते साडेसहादरम्यान हॉटेलमधून चहाच्या वाफा निघायला सुरुवात होतात आणि त्याबरोबरच भजीचा वासही दरवळू लागतो. तेव्हा बहुतांशजणांच्या दिवसाला सुरुवात होते. बस, जीपमधून प्रवासी उतरु लागतात. पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी त्या वाहनात चढू लागतात. त्यांना आधी गवळ्याप्पांच्या हॉटेलमधील चहा प्यावासा वाटतो. भजी खावीशी वाटते. विशेष म्हणजे शाळा, कॉलेजला जाणार्‍या तरुण, तरुणींची आदबीने ते विचारपूसही करतात.

अनेकजण त्यांच्या हॉटेलमधून भजी पार्सलद्वारे आपले मित्र-मैत्रिणींसाठी नेतात. तशी विनंवणीही खवय्यांकडून केली जाते. पैसे असो वा नसो कधीच विचारणा केली जात नाही, असेल तेवढे द्या, नसेल तर पुन्हा द्या, नाही तर जाऊ द्या. पोट भरलं की नाही, नसेल तर अजून घ्या, असा आग्रह नम्रपणे केला जातो. सत्तरीकडे झुकलेले वय, भजी तळण्यात गुंतलेले हात, सर्वांवर भिरभिरणारी नजर, प्रत्येकाची आदबीने सुरु असलेली चौकशी आणि ताटातील भजी संपली की धावत पुन्हा ताटात भजी भरणे आणि पोटभरुन खा, असा वारंवार आग्रह करणे यामुळे नेहमीच त्यांच्या हॉटेलभोवती ग्राहक रुंजी घालतात.

आपल्या हातात काय आहे.. (वर हात करत) तो आहे म्हणून आपण आहोत. आपण थोड्याच दिवसांचे सोबती, सोबत काय घेऊन जाणार आहोत का… (समोरच्यांना विचारत) नाही ना…? मग ऐटीत राहायचं.. मनोसोक्‍त खायचं. दुसर्‍यांना लुटायचे नाही. फसवायचे नाही. फसवलात तर (हात वर करत) त्याच्याशी म्हणजे देवाशी गाठ आहे. जो दुसर्‍याला फसवतो, तो स्वत: फसतो, ही समजूत गवळ्याप्पांची. त्याला सगळेच सहमत आहेत.

निराधारांना आधार अन् चालक, वाहकांना सेवा

शावळ तसे वर्दळीचे गाव. बसबरोबरच अन्य खासगी वाहनेही मोठ्या प्रमाणात येतात. त्या गाड्यांचे चालक, वाहकांना नाष्टा, चहा मोफत देऊन एकप्रकारे गवळ्याप्पा त्यांच्यासह त्यांच्या सेवेला प्रोत्साहन देत असतात. बिल देण्यासाठी आग्रह केला तरीही ते पैसे घेत नाहीत. अनेकवेळा सकाळी सकाळी येणार्‍या भाविकांना मोफत चहा-नाष्टाही देतात. याशिवाय गावात येणार्‍या निराधार, निराश्रीत, भिकार्‍यांना ते मोफत पोटभर स्वच्छ, ताजा नाष्टा देतात. त्यांना पाणी देऊन विचारपूस करतात. सकाळी देवपूजेनंतर चालक, वाहक, निराधारांसह ग्राहकांनाही ते मोफत चहा, नाष्टा देतात आणि त्यानंतर स्वत: चहा घेतात.

गरिबांनाच गरिबीची जाणीव…

शिवपाद लक्ष्मण किणगे असे गवळ्याप्पा महाराजांचे नावे. ते मुळचे ब्यागेहळ्ळी (ता. अक्‍कलकोट) येथील रहिवासी. लहानपणीच त्यांच्यावर अनेक आघात झाले. जगायची तीव्र इच्छा असताना मात्र त्यांच्या वाटेवर काटेच काटे निर्माण झाले. अनपेक्षितपणे आलेल्या संकटांना न घाबरता त्यांनी अलौकिक निर्माण करण्याचा ध्यास घेतला. कशाचाही विचार न करता शावळ येथील आजोळी आले. तेथे मिळेल ते काम करू लागले. त्यानंतर शावळ परिसरातून दूध गोळा करुन डेअरी व घरोघरी घालण्यासाठी सायकल, कधी वाहने, तर कधीकधी रेल्वेने त्यांचा प्रवास सुरू झाला. प्रचंड गरिबी. पण ते कशालाही घाबरले नाहीत. माणुसकीचा यज्ञ मांडून ते माणुसकी वाढविण्यासाठीच झटले. गरिबीची जाणीव असल्यामुळे ते आजही गरिबांना हृदयाशी कवटाळत त्यांना मदत करतात. दुसर्‍याची किंमत नसलेल्या याकाळात ते आजही हॉटेलच्या माध्यमातून अन्नदान करुन माणुसकीचा यज्ञ चालू ठेवला आहे.

व्यवसायातून द्वेश.. तरीही सदासर्वकाळ खूश

व्यवसाय, धंदा म्हटले की स्पर्धा आलीच. त्यातून वैरत्व आणि द्वेशाचा जन्मही होणारच. याचाही त्रास गवळ्याप्पा महाराजांना फार झाला. मात्र त्यांनी कधीच त्याचे भांडवल केले नाही. स्पर्धक व्यावसायिक गवळ्याप्पा महाराजांच्या नजरा चुकवून दुधाच्या घागरी आणि कॅनमध्ये मिठाचे खडे टाकायचे. दूध नासून त्यांचे मोठे नुकसान व्हायचे. दूध वाया गेल्यानंतरही पशुपालकांना ते पैसे द्यायचे. दूध घेणार्‍यांचे ते कधीच पैसे चुकविले नाहीत. द्वेश भावनेतून मीठ टाकणार्‍यांनाही त्यांनी कधीच दोष दिला नाही. उलट ते ही सगळी देवाची महिमा आहे, असे म्हणायचे आणि स्वत: सदासर्वकाळ खूश राहायचे.

फेटा उडविला की थांबायची रेल्वे…

शेत, वाड्यावस्त्यांवर जाऊन दूध गोळा करायला त्यांना अधूनमधून फारच उशीर व्हायचा. यामुळे रेल्वे चुकायची भीती निर्माण व्हायची. शावळपासून अक्‍कलकोट रेल्वेस्थानकापर्यंत यायला रस्ताही व्यवस्थित नव्हता. धावपळ करत कसेबसे ते रेल्वे गाठण्याचा प्रयत्न करायचे. कधीकधी रेल्वे येऊन थांबलेली असायची. त्यावेळी गवळ्याप्पा महाराज स्वत:च्या डोक्यावरचा फेटा उडविल्यानंतर रेल्वेचे चालक त्यांच्यासाठी काहीवेळ रेल्वे थांबवून ठेवायचे. याची आठवण वारंवार शावळचे ग्रामस्थ, त्यांचे मित्र, अक्‍कलकोट रेल्वेस्थानकावरील नागरिक व व्यावसायिक सांगतात.

विद्यार्थी, नोकरदारांचे पोहोचवायचे डबे

शावळ, घुंगरेगाव, गौडगाव बु॥, अक्‍कलकोट स्टेशन, तांडे, वाड्यावस्त्या, कडबगाव येथील विद्यार्थी व नोकरदारांचे डबे दुधाच्या घागरी, कॅन ते इमानेइतबारे त्यांचे रुम, शाळा, कॉलेजपर्यंत स्वत: पोहोचवायचे. ऊन, वारा, थंडी, पाऊस याचा तमा न बाळगता ते डबे पोहोचवायचे. यामुळे त्यांना 'अन्नदाता', 'देवदूत' म्हणूनही संबोधले जाते. ही परंपरा त्यांनी हॉटेलच्या माध्यमातून आजही सुरू ठेवली आहे.
संकट हरले, अप्पा जिंकले

शिवपाद किणगे हे त्यांचे नाव असले तरी त्यांना अनेक टोपणनावाने ओळखले जाते. कोण 'अप्पा', तर कोण 'गवळ्याप्पा', बहुतांश जण 'महाराज', काहीजण 'देवबाप्पा', अनेकजण 'देवरु', 'अन्नदातरु' (अन्नदाता), 'कलियुगातील दाता', 'निराधारांचा आश्रयदाता' यासह अनेक नावांनी त्यांना ओळखले जाते. माणसातच देव शोधावा, अशी भावना व्यक्‍त करणार्‍या गवळ्याप्पांच्या जीवनात अनेक संकटे आली. पण ती संकटे हरली आणि अप्पाच जिंकले. तेही माणुसकीच्या बळावर आणि दातृत्वावर.

शावळमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. हे आमच्यासाठी अभिमान आहे. त्यांच्यामुळे अनेकांना आधार मिळाला आहे. गावाचे नावही होत आहे. त्यांच्या दातृत्वाला सलाम. माणुसकी हरवत चाललेल्या या युगात दाता, अन्‍नदात्याच्या रुपात त्यांचे अनेकांवर उपकारच होत आहेत.
– गंगाधर नागशेट्टी
शिक्षक, शावळ

घरातील लहान मुलांना रुपया, दोन रुपये द्यायचे होत नाही. पण शिवपाद अप्पा येणार्‍या प्रत्येकाला बिलाचा हिशोब न मांडता नाष्टा, चहा देतात. अनेकवेळा स्वत:च्या जेवणाचा डबाही बहाल करतात. आई-वडिलांना विसरणार्‍या या युगात निराधार आणि अनोळखी माणसांप्रति माणुसकी जपणारे गवळ्याप्पा हे 'देवदूत'च आहेत.
– परशुराम सुतार
ग्रामस्थ, शावळ

गवळीचे काम, विद्यार्थ्यांना मदत, रोजगार हमीवर काम, विहीर मारायला जाणे यासह त्यांनी अनेक कामे केली. सगळ्या ठिकाणी मात्र त्यांनी माणसात देव शोधण्याचाच प्रयत्न केला. स्वत: उपाशी राहिले. मात्र इतरांना उपाशी झोपू दिले नाही. त्यांच्यामुळे शावळचे नाव जगाच्या कानाकोपर्‍यांत पोहोचत आहे.
– शिवप्पा वालीकर
ग्रामस्थ, शावळ

वडिलांचे मन हे मातृहृदयी आहे. ते कधीच रागाला येत नाहीत. आपल्याजवळ असलेले इतरांना द्यावे आणि आपले समाधान इतरांना वाटावे, असा त्यांचा नेहमीच आग्रह असतो. त्यांच्याच शिकवणुकीचे आणि कार्याची मी पुढे वाटचाल चालू ठेवणार आहे.
– शंकरलिंग किणगे
मुलगा

हेही वाचलंता का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT