सोलापूर

‘पुढारी’च्या विविध उपक्रमामुळे नारीशक्‍तीला बळ

अविनाश सुतार

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : केवळ बातमीदारी न करता मागासलेपणाला प्रवाहात आणण्याबरोबरच अनेक सामाजिक उपक्रमात पुढाकार घेऊन मदत करण्यात दैनिक 'पुढारी'चा (pudhari) मोठा वाटा आहे. उद्योग, कृषी, शिक्षण, आरोग्य या प्रश्‍नांना न्याय मिळवून देत सैनिकांसाठी सियाचिनमध्ये हॉस्पिटलची उभारणी केली आहे. सगळ्याच क्षेत्रामध्ये 'पुढारी'ने आपल्या योगदानाद्वारे पुढारीपण जपले आहे. आता कस्तुरी क्‍लबच्या माध्यमातून नारीशक्‍तींना व्यासपीठ मिळवून देण्यात येत आहे. 'पुढारी'च्या विविध उपक्रम, योगदान आणि कल्पनेमुळे सध्या नारीशक्‍तीला चांगले बळ मिळत असल्याचा सूर मान्यवरांनी आळविला.

दैनिक 'पुढारी' (pudhari) सोलापूर आवृत्तीच्यावतीने जागतिक महिलादिनानिमित्त आयोजिन 'नारी शक्‍ती सन्मान-२०२२' च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्‍त करत दैनिक 'पुढारी'च्या सामाजिक बांधिलकीबरोबरच सडेतोड वृत्ताचेही कौतुक केले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर होते. यावेळी 'वर्‍हाड निघालंय लंडन'ला फेम अभिनेता संदीप पाठक, 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री राधिका देशपांडे, आमदार प्रणितीताई शिंदे, पोलीस आयुक्‍त हरिष बैजल, छाया बैजल, इंडियन मॉडेल स्कूलच्या सचिव सायली जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, दैनिक 'पुढारी'चे आवृत्ती प्रमुख तथा न्यूज ब्युरो चीफ अमृत चौगुले, दैनिक 'पुढारी'च्या पंढरपूर विभागीय कार्यालयाचे प्रमुख प्रा. सिद्धार्थ ढवळे आदी उपस्थित होते.

महिलांना उपकार म्हणून नव्हे, तर त्यांच्या कतृत्वामुळेच सध्या सर्वच ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळत आहे. त्या सर्वच क्षेत्रामध्ये पुढारल्या आहेत. त्यांच्यातील कौशल्य, ताकद आणि क्षमतेच्या भरवशावर त्या प्रत्येक संघर्षाची लढाई लढून त्यात यशस्वी होत आहेत. यामुळे त्यांना राष्ट्रपतीपासून ते पंतप्रधानपदापर्यंत मजल मारता आली. छोटी गावे, छोट्या कुटुंबातील मुली, महिलाही आपल्या अलौकिक कामगिरीच्या बळावर लौकित्व प्राप्‍त करत आहेत, याचा अभिमान वाटत असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

काम करणार्‍यांचेच कौतुक होत असते. त्यांचाच सन्मान होत असतो. बहुतांशवेळा आपण केलेले काम सन्मानापर्यंत पोहचत नाही. आपला सन्मान झाला नाही, म्हणून नाउमेद होऊ नका. आणखी चांगले काम आपल्या हातून घडावे, यासाठी असे सन्मान तुमची वाट पाहत असते, अशा भावना छाया बैजल यांनी व्यक्‍त केल्या.

महिला ठरवून, ध्येय निश्‍चित करुन पादाक्रांत करत आहेत. यामुळे आपण प्रगतीच्या टप्प्यात पोहचत आहोत. यामुळेच सन्मान आपल्यापर्यंत पोहचत आहेत. कर्तृत्वाच्या बळावर आपले स्थान निर्माण करा. असे स्थान निर्माण करा की जगाने आपली दखल घेतली पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहचत नाही, तोपर्यंत आपला प्रवास थांबवू नका, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

प्रास्ताविक अमृत चौगुले यांनी केले, सूत्रसंचालन श्‍वेता हुल्ले यांनी केले. आभार प्रदर्शन महेश पांढरे यांनी केले. यावेळी डॉ. ऋचा मोरे, ग्लोबल व्हिलेजच्या प्राचार्या आसमा नदाफ, मुस्ताक शेख, प्रा. अप्पासाहेब गुगले, सुरेखा मोकाशी, अनुराधा शिंदे, स्मिता कदम, निमा शिंदे, रत्नमाला मछाले, वंदना भगरे, शिताबाई जाधव, सत्यभामा शिगटे, तृप्‍ती पुजारी, ज्योती कुंभार, अजंली कुंभार, सुनिता भोसले, ज्योत्सना भारती, सुजाता गुंडेवार, समृध्दी मासाळ, माधवी शिंदे, प्रतिक्षा शिंदे, संतोष भोसले, गुरु वठारे, पायल बनसोडे, पियू बनसोडे, डॉ. रमेश सिद, पद्मिनी शेट्टीयार, शशिकांत आतकरे, राजेंद्र गायधनकर, महेश भोसले, ओंकार साबळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रास्ताविकेत दै. पुढारी सोलापूर आवृत्तीचे आवृत्ती प्रमुख तथा न्यूज ब्युरो चीफ अमृत चौगुले यांनी दै. 'पुढारी'च्या सामाजिक बांधिलकी, सैनिकांसाठी सियाचिन येथे सुरु केलेले हॉस्पिटल, किल्लारी भूकंप, महापूरग्रस्तांना मदत यासह कृषी, सिंचन, औद्योगिकरणासह सर्व समाज घटकांच्या हितासाठी योगदान दिल्याचे सांगितले. सूत्रसंचालन श्‍वेता हुल्ले यांनी केले. तर बातमीदार महेश पांढरे यांनी आभार मानले.

जिथे मराठी माणूस, तिथे करणार प्रयोग

लक्ष्मणराव देशपांडे यांनी 'वर्‍हाड निघालंय लंडनला' याच्या प्रयोगाने विक्रमाचा इतिहास घडवत विश्‍व विक्रम केला आहे. आता मीही याचे प्रयोग करत आहे. माझे व देशपांडे यांच्या प्रयोगामुळे नव्या विक्रमाची नोंद होणार आहे. मी 25 वर्षे सतत मराठी रंगभूमीवर काम करत आहे. आईने मला माणूस म्हणून जन्मी घातले आणि रंगभूमीने मला नट घडविले. या रंगभूमीसाठीच माझे काम चालू असणार आहे. आतापर्यंत 14 देशांमध्ये माझे प्रयोग झाले आहेत. जिथे मराठी माणूस आहे, त्या प्रत्येक ठिकाणी 'वर्‍हाड निघालंय लंडनला' याचे प्रयोग करणार आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी मी प्रयोग केले आहेत. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असे सांगत अभिनेता संदीप पाठक यांनी 'वर्‍हाड निघालंय लंडनला' या नाटकातील काही भागाचे अभिनयही सादर केले. लग्‍न, त्यातील संवाद, सतत 'वन्सं'चा उच्चार आणि 'मीच जास्त बोलते ना' असे म्हणत सतत बोलत राहणार्‍या महिलेच्या संवादामुळे सभागृहात हास्याचे फवारे उडाले. सगळेच हास्यसागरात बुडाले. विमान उडतानाच्या आवाजाने सभागृहात टाळ्यांबरोबर शिट्ट्यांचा आवाजही घुमला.

प्रणितीताईंनी ऐकलंच नाही….

वर्‍हाड निघालंय लंडनला याचे अभिनय सादर करताना संदीप पाठक यांनी त्यांच्या संवादात खास सोलापुरी प्रसंग आणि भाषाही वापरली. मी प्रणितीताईंना माझे लग्‍न याच्याबरोबर करण्यासाठी नको नको म्हणत होते, मात्र पाठीवर हात फिरवत माझी मानसिकता बदलून त्यांनी लग्‍न लावू दिलं, आ. प्रणितीताईंनी माझं ऐकलंच नाही, यामुळे मला आता सहन नव्हे तर भोगावेच लागेल, असे म्हणत पाठक यांनी प्रणितीताईंना मंत्री नव्हे तर मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

शिवाबरोबरच शक्‍तीचीही पूजा : राधिका देशपांडे

नेहमीच नव्याचा ध्यास घेत प्रत्येक क्षेत्रात चांगल्याचे पुढारीपण जपणार्‍या दैनिक 'पुढारी'ने (pudhari) शिवाला शक्‍तीची जोड दिली आहे. महिलांमधील ही शक्‍ती ओळखून आज पुरस्काराच्या रुपात नारीशक्‍तीची त्यांनी पूजा बांधली आहे. ही पूजा तमाम नारी जातीला प्रोत्साहन, प्रेेरणा, बळ, ताकद देणारी आहे. दैनिक 'पुढारी'ने या माध्यमातून नव्या स्वप्नाची वाट दाखविली आहे. ही वाट चालत आपण आपल्यातील कलागुणांबरोबरच इतर शक्‍तीचीही चुणूक दाखवून देऊया. दैनिक 'पुढारी'कडून मिळालेली ही ताकद सगळ्यांना यशाच्या शिखरावर पोहचविल्याशिवाय राहणार नाही. फक्‍त जागे राहून स्वप्न पहा, पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करा. सतत लढा आणि निर्धार करा, मग आपण एक दिवशी ध्रुव तारेप्रमाणे अढळ स्थानी पोहचू. तेव्हा आपली सर्वत्र आणि सदाकाळ पूजा बांधली जाईल, असे मत अभिनेत्री राधिका देशपांडे यांनी व्यक्‍त केले.

यांचा झाला गौरव….

रश्मी बागल-कोलते (समाजकारण, राजकारण), जि. प. च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील (प्रशासकीय), जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमाला गायकवाड (राजकारण), आयएएस अधिकारी मनिषा आव्हाळे (प्रशासकीय), हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई भोसले (समाजसेवा), मनोरमा मल्टिस्टेटच्या अध्यक्षा शोभा मोरे (सामाजिक, सहकार), आशाताई नागणे (सहकार), सुरजा बोबडे (सामाजिक, शैक्षणिक), रेखा राऊत (राजकारण), गंगुबाई जगताप (राजकीय), जि. प. च्या उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंके (शैक्षणिक), मुख्याध्यापिका संगीता शहा-चनशेट्टी (सामाजिक, शैक्षणिक), डॉ. सुजाता गुंडेवार (वैद्यकीय सेवा), डॉ. सविता सिद (वैद्यकीय सेवा), डॉ. शगुफ्ता तांबोळी (ब्युटी मेकअप आर्टिस्ट- कला), माधुरी दिलीप धोत्रे (समाजसेवा), आशा टोणपे (बचत गट), ज्योती कुंभार (समाजसेवा), सीमा रजपूत (सौंदर्यवती), कवयित्री संगीता मासाळ (समाजसेवा), संजीवनी लुबाळ (समाजसेवा), गंगूबाई लोखंड (संघर्षमय जीवनगाथा), वसुधा इसेकर, (समाजसेवा), पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते (मिशन ऑपरेशन परिवर्तन) यांचा त्यांच्या विशेष आणि उल्लेखनीय कामगिरीमुळे विशेष सन्मान करण्यात आला.

संदीप पाठकांनी घडवली लंडनवारी

अभिनेते संदीप पाठक यांनी दै. 'पुढारी'च्या (pudhari) नारी शक्‍ती पुरस्काराचे कौतुक केले. कवी फ. मुं. शिंदे यांची 'आई' वरील ऐकवली. 'वर्‍हाड निघालंय लंडनला' या एकपात्री प्रयोगातील एका भागाचे सादरीकरण केले. त्यांच्या या अदाकरीवर उपस्थितांतून हास्याचे कारंजे उडाले, लंडनवारीचा अनुभव घेतला. गेल्या दहा वर्षांपासून 'वर्‍हाड निघालंय लंडनला'चा एकपात्री प्रयोग करीत आहे. दोनदा गिनिज बुकमध्ये नोंद झालेले हे पहिला मराठी प्रयोग आहे. माझे 400 प्रयोग झाले आहेत. आणखी एक विक्रम गिनीज बुकमध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे पाठक यांनी सांगितले.

… अन् सभागृह गहिवरले

घरोघरी धुणी-भांडी करुन मुलीला इंजिनिअर केलेल्या पुरस्काराच्या मानकरी गंगूबाई लोखंडे यांनी सर्वांनाच भावनाविवश केले. पुरस्कारासाठी नाव पुकारताच भरल्या डोळ्यांनी व्यासपीठाच्या पायर्‍या चढल्या. पुरस्कार स्वीकारताना गंगुबाई आणि तिची मुलगी अंजली लोखंडे यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करुन दिली. भरल्या डोळ्यांनी गंगूबाईंनी दै. 'पुढारी'चे  (pudhari)आभार मानले. आ. प्रणितीताई शिंदे यांनी गंगूबाईला मिठी मारुन तिचे कौतुक केले. हे दृष्य आणि प्रसंग दै. 'पुढारी'च्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा ठरला. त्यांच्या संघर्षाची कथा कळताच उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले आणि त्यांनी केवळ अश्रू न ढाळता मदतीसाठीही पुढाकार घेतला.

पुरस्कारप्राप्‍त विजेत्यांच्या भावना

आपल्यातील कौशल्य, जिद्द, जबाबदारी पेलण्याची ताकद, नव्याचा ध्यास घेत घेतलेला निर्णय यामुळे आपण सर्वच ठिकाणी स्थान निर्माण करत आहोत. याच ताकतीवर चावडीपर्यंत महिलांनी मजल मारली आहे. अजून भरपूर काळ शिल्लक आहे.
-जयमाला गायकवाड, माजी अध्यक्षा, जिल्हा परिषद, सोलापूर

महिलांकडे प्रत्येक गोष्ट सहन करण्याची ताकद आहे. याच ताकदीच्या बळावर त्या आपल्यातील कौशल्यही सहन करतात. त्याला बाहेर येऊ देत नाहीत. आता न थांबता कौशल्य विकसित करा आणि त्याला बाहेर येऊ द्या. यातून नवा मार्ग सापडेल आणि आपला विकास होईल.
– शोभाताई मोरे, अध्यक्षा, मनोरमा मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी

स्त्री ही सगळ्यांना समजून घेते. विशेष म्हणजे साठीतील स्त्री ही सर्वात तरुण असते. तिला नातवंडांच्या भावभावना कळतात. ती सुनांची मैत्रिण असते. विशेष म्हणजे तिला बाहेर जाताना कोणाचीही परवानगी घ्यावी लागत नाही. आपल्या साठीच्या काळात काठीची भाषा न करता नव्याचा ध्यास आपल्याला घेता यायला पाहिजे.
– डॉ. सुजाता गुंडेवार, स्त्री रोग तज्ज्ञ

आपण स्वत:ला ज्याप्रमाणे जपतो. त्याप्रमाणेच आपले ध्येय साध्य करण्यासाठीही झटले पाहिजे. यातूनच नवा मार्ग सापडतो आणि त्यातून आपले कर्तृत्व सिद्ध होते. यासाठी प्रत्येकांनी काम केले पाहिजे.
-स्वाती पाटील, अध्यक्षा, महिला बचत गट

घर, संसार यातून बाहेर पडून राजकारणात काम करण्याची संधी मिळाली. ही संधी कुटुंबीय आणि दिलीप सोपल यांनी दिली. याचे मला सोने करताआल्याचे अभिमान वाटत आहे. कुटुंबासह समाजाचीही साथ हवी असते. ती मिळवत आपले स्थान निश्‍चित करता येते. प्रत्येकांनी अभिमानास्पद कामगिरी केली पाहिजे.
-रेखा राऊत, अध्यक्षा, शुभदा महिला स्वयंसहायता बचत गट

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT