PAKvsAUS : पाकविरुद्धच्या ODI-T20 मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला पुन्हा मोठा धक्का! | पुढारी

PAKvsAUS : पाकविरुद्धच्या ODI-T20 मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला पुन्हा मोठा धक्का!

पुढारी ऑनलाईन डेस्क : PAKvsAUS : पाकिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका आणि एकमेव टी-२० सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला कोपराच्या दुखापतीमुळे मर्यादित षटकांच्या मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या म्हणण्यानुसार, स्मिथच्या डाव्या कोपराला झालेल्या दुखापतीमुळे पाकिस्तान दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या सामन्यांना त्याला मुकावे लागणार आहे. कसोटी मालिकेदरम्यान स्मिथच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यातून सावरण्यासाठी तो या मालिकेतून बाहेर पडला असून विश्रांती घेणार आहे. स्टीव्ह स्मिथच्या कोपराची समस्या अनेक दिवसांपासून आहे, परंतु असे असतानाही त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे सुरूच ठेवले. मात्र, वैद्यकीय कर्मचार्‍यांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांनी आता विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. (PAKvsAUS)

यावर स्मिथने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, पाकिस्तानविरुद्ध मर्यादित षटकांची मालिकेत न खेळणे हे खूप निराशाजनक आहे. परंतु वैद्यकीय कर्मचार्‍यांशी सल्लामसलत केल्यानंतर मला समजले की यावेळी विश्रांती घेणे योग्य आहे. आत्ता ही मोठी समस्या नसली तरी भविष्यात मला अधिक समस्यांना सामोरे जावेसे वाटत नाही. माझी दुखापत जरी गंभीर नसली, तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नाहीतर पुढील काळात अनेक समस्या निर्माण होण्याची भीती आहे. (PAKvsAUS)

दरम्यान, तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आपल्या कामगिरीने छाप पाडण्यात अपयशी ठरलेला लेगस्पिनर मिचेल स्वॅपसनचा स्मिथच्या जागी संघात समावेश करण्यात आला आहे. तीन वनडे आणि एक टी २० सामन्याचे आयोजन अनुक्रमे २९ मार्च, ३१ मार्च, २ एप्रिल आणि ५ एप्रिलला करण्यात आले आहे. हे सर्व सामने लाहोरमध्ये होणार आहेत. ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स या प्रमुख खेळाडूंना आधीच विश्रांती दिली आहे, तर वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनही दुखापतीमुळे संघाबाहेर पडला आहे. (PAKvsAUS)

ऑस्ट्रेलियाचा संघ :

अॅरॉन फिंच (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, जेसन बेहरेनडॉर्फ, अॅलेक्स कॅरी, बेन द्वारशुईस, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, बेन मॅकडर्मॉट, मार्कस स्टॉइनी, बेन मॅकडर्मॉट मिशेल स्वेपसन, अॅडम झाम्पा.

Back to top button