मोहोळ : तालुक्यातील शिरपूर सो. या गावात वादळीवाऱ्यामुळे शेतातील छप्पर अंगावर पडून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.२३) सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. तानुबाई मारुती गायकवाड (वय ८०) असे मृत महिलेचे नाव आहे.
मोहोळ तालुक्यातील शिरापूर सो. येथे शुक्रवारी सायकाळच्या सुमारास वादळी-वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यादरम्यान तानुबाई गायकवाड या शेतातील छप्परात निवाऱ्याला बसल्या होत्या. जोराचा वादळी वारा सुटल्याने छप्पर अंगावर पडून तानुबाई यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मोहोळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.