

Beed Crime News
नेकनूर : लिंबागणेश परिसरातील महाजनवाडी शिवारात पवनचक्कीचे साहित्य असलेल्या कामाच्या ठिकाणी गुरुवारी रात्री उशिरा गोळीबाराची घटना घडली. पंधरा ते वीस चोरांनी या ठिकाणी चोरीचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात असून चोरांनी गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे.
येथील सुरक्षारक्षकाच्या गोळीबारात एक जणाचा मृत्यू झाला असून मयताची ओळख पटलेली नाही. मात्र एक किलोमीटर अंतरावर या चोराचा मृतदेह सापडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.
मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील लिंबागणेश आणि महाजनवाडी शिवारात असलेल्या 'O2 renewable limited' पवनचक्की रखवालदाराने दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री चोरी करण्याच्या उद्देशाने पंधरा ते वीस जण आले होते. त्यामुळे रखवालदाराने केलेल्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला. चोरांनी देखील या ठिकाणी गोळीबार केल्याचे बोलले जात असले तरी पोलिसांकडून याला दुजोरा मिळालेला नाही.
या इसमाचे प्रेत जवळच्या महाजनवाडी शिवारातील झाडीत शेळ्या चारणाऱ्या शेतकऱ्यांने पाहिले असता ही माहिती त्याने नेकनुर पोलिस स्टेशनचे प्रभारी चंद्रकांत गोसावी यांना कळवली. ते पोलीस टीम देऊन घटनास्थळी दाखल झाले. मात्र घटनास्थळापासून संबंधित मयत एक किमी दूर गेला कसा? हा प्रश्न उपस्थित होत असून जखमी अवस्थेत तो तिथपर्यंत गेल्याचे पोलीसांच्या माहितीतून पुढे येत असले तरी तपासातून अजून काही पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोळीबार करणाऱ्या सुरक्षारक्षकाला नेकनुर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.