Ashadhi Wari 2024
श्री विठ्ठल-रुक्मिणीची मेघडंबरी महू लागली चांदीने! File Photo
सोलापूर

Ashadhi Wari 2024| श्री विठ्ठल-रुक्मिणीची मेघडंबरी महू लागली चांदीने!

पुढारी वृत्तसेवा

सुरेश गायकवाड

पंढरपूरच्या मंदिरातील गाभाऱ्यात श्री विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीवर बसविण्यात येणाऱ्या मेघडंबरीसाठी आवश्यक असणारी दोन कोटी रुपये किमतीची २२५ किलो चांदी एका अज्ञात भक्ताने दान केली आहे. या दानशूर भक्ताने नाव जाहीर करण्यास नकार दिला आहे.

चांदी प्राप्त होताच मेघडंबरी चांदीने मढविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा १७ जुलैला होत आहे. त्याअनुषंगाने दर्शनासाठी पंढरीत भाविकांची गर्दी देखील वाढू लागली आहे.

चार जुलैपर्यंत चांदीने मढवलेली ही मेघडंबरी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या गाभाऱ्यात बसविण्यात येणार आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम पुरातत्त्व विभागामार्फत सुरू आहे. त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व श्री रुक्मिणी गाभारा येथील मेघडंबरीदेखील काढली होती.

मात्र, आता तेथील संवर्धनाचे काम प्राधान्याने पूर्ण केले आहे. श्री विठ्ठल गाभारा व श्री रुक्मिणी गाभारा येथील मेघडंबरीदेखील नव्याने तयार करून बसविण्यात येत आहे. त्यासाठी श्रीसंत कबीर महाराज मठ व फडातर्फे मठाचे ह. भ. प. विष्णू महाराज कबीर यांनी सेवाभावी तत्त्वावर दोन मेघडंबरी मंदिर समितीस उपलब्ध करून दिल्या आहेत.

या दोन्ही मेघडंबरी पंढरपूर येथील अमोल सुतार, बाळू सुतार, पांडुरंग लोंढे या कारागिरांनी तयार केल्या आहेत. त्यासाठी देवरूख (जि. रत्नागिरी) येथील तीन ते चार वर्षांपूर्वीच्या सागवाणी लाकडाचा वापर केला आहे.

श्री विठ्ठलाच्या मेघडंबरीचे वजन १६०, तर श्री रुक्मिणी मातेच्या मेघडंबरीचे वजन ११० किलो आहे. या दोन्ही मेघडंबरीचे सुमारे तीन लाख ५० हजार इतके बाजारमूल्य आहे. मेघडंबरी

तयार करण्यासाठी ३५ ते ४० दिवसांचा कालावधी लागला आहे. मेघडंबरी बनविण्याचे काम मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. या दोन्ही मेघडंबरीला एका अज्ञात भाविकाने मंदिर समितीकडे संपर्क साधून मेघडंबरींसाठी लागणारी २२५ किलो चांदी दान केली आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास दरवर्षी लाखो रुपयांच्या देणगी देतात

ही चांदी मेघडंबरीला मंदिरातच मढवून आषाढी यात्रेपूर्वी म्हणजेच चार जुलैला गाभाऱ्यात बसविण्याचे नियोजन केल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

२२५ किलो चांदीचे सर्वात मोठे दान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पंढरीनगरीचे महात्म्य देश-विदेशातील भाविकांपर्यंत पोहोचलेले आहे. त्यामुळे अनेक भाविक दर्शनासाठी येतात.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास दरवर्षी लाखो रुपयांच्या देणगी देतात. मोलमजुरी करणाऱ्या महिला भाविकापासून करोडपती भाविकांनी रोख रक्कम, सोने- नाणेच्या रूपात दान दिलेले आहे. यापूर्वी जालना येथील एका भाविकाने सुमारे तीन कोटी रुपये किमतीचा सोन्याचे मुकुट, सोन्याच्या पितांबराची देणगी आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी होती. मात्र, हे दान त्यांनी दोन टप्प्यांत दिले होते. परंतु, आता एकाच वेळी दिलेली दोन कोटींच्या किमतीची २२५ किलो चांदी मेघडंबरीसाठी दान देऊन भाविकाने आपले नाव गुप्त ठेवले आहे. हे सर्वात मोठे दान असल्याचे मानले जाते.

SCROLL FOR NEXT