Dhangar Arakshan  
सोलापूर

Dhangar Arakshan | सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग ठप्प! जामखेड फाटा येथे टायर जाळून धनगर समाजाचा रास्ता रोको; आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा

Dhangar Arakshan | जालना येथील उपोषणकर्त्याची तब्येत खालावल्याच्या पार्श्वभूमीवर समाज बांधव आक्रमक झाले असून, त्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे थांबवली.

पुढारी वृत्तसेवा

जामखेड (प्रतिनिधी):

धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी अंबड तालुक्यातील जामखेड फाटा येथे सोमवारी (३० सप्टेंबर) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास धनगर समाज बांधवांनी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग ५२ वर टायर जाळून जोरदार रास्ता रोको केला. जालना येथील उपोषणकर्त्याची तब्येत खालावल्याच्या पार्श्वभूमीवर समाज बांधव आक्रमक झाले असून, त्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे थांबवली.

आंदोलनाचे कारण आणि आक्रमक घोषणाबाजी

धनगर समाजाच्या एसटी आरक्षण (Scheduled Tribe Reservation) अंमलबजावणीच्या मागणीसाठी जालना येथे १७ सप्टेंबर २०२५ पासून दीपक बोराडे उपोषणाला बसले आहेत. दीर्घकाळ उपोषण सुरू असल्याने त्यांची तब्येत खालावली असून, या बातमीमुळे धनगर समाज बांधव संतापले आणि आक्रमक झाले.

या संतापातूनच, ३० सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास जामखेड फाटा येथे शेकडो धनगर समाज बांधव राष्ट्रीय महामार्गावर जमले आणि त्यांनी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला:

  • "धनगर एस.टी. आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे!"

  • "येळकोट येळकोट, जय मल्हार!"

  • "धनगर एकजुटीचा विजय असो!"

  • "या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं, वर पाय!"

महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा

रात्रीच्या वेळी अचानक झालेल्या या रास्ता रोकोमुळे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

जामखेड फाटा हा एक महत्त्वाचा जंक्शन असल्याने, लांब पल्ल्याच्या अनेक मालवाहू गाड्या आणि प्रवासी वाहने रस्त्यावर थांबून राहिली होती. आंदोलन शांततेत सुरू असले तरी, महामार्गावरील कोंडीमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी

धनगर समाजाची प्रमुख मागणी एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची आहे. मेंढपाळ, धनगर, हाटकर हे समाज पारंपारिकपणे भटकंती करणारे आणि आर्थिक तसेच सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी, यासाठी समाज गेली अनेक वर्षे सातत्याने संघर्ष करत आहे.

जालना येथील उपोषणकर्त्याच्या आरोग्याच्या चिंतेमुळे समाजाने आता तीव्र आंदोलन हाती घेतले असून, केवळ घोषणाबाजी न करता ठोस कार्यवाही करावी, अशी त्यांची मागणी आहे. जामखेड फाटा येथील या रात्रीच्या आंदोलनामुळे प्रशासनाला तातडीने दखल घ्यावी लागली असून, या आंदोलनाचे पडसाद मराठवाड्यासह राज्यभर उमटण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT