

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरातील वीज पोलवरील २.५ किमी लांबीच्या अॅल्युमिनियम तारा तसेच शेतातील पाण्याच्या मोटारी चोरीप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने स्थलांतरित चौघांना अटक केली असून, एकूण ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि.११ फेब्रुवारी रोजी महावितरणचे सहाय्यक अभियंता लुटे यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. विद्यापीठ परिसरातील सुमारे १० खांबांवरील अॅल्युमिनियम तारा अज्ञात व्यक्तींनी चोरल्याचे त्यांनी नमूद केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासासाठी स्थागुशाच्या पथकाने गोपनीय माहिती आधारे 28 सप्टेंबर रोजी आरोपी प्रद्युग्न ऊर्फ हरभजनसिंग टाक (रा.अण्णाभाऊ साठे नगर, परभणी) याला अटक केली. त्याच्या चौकशीतून त्याने इतर तिघांसोबत मिळून वीजतारा चोरी केली होती. शिवाय त्यांनी पाथरी शिवारातील एका शेतातून मोटार, कापूस व इतर साहित्य देखील चोरी केल्याची कबुली दिली.
तपासा दरम्यान नवा मोंढा पोलीस स्टेशन, पो.स्टे.पाथरी, पो.स्टे. पाथरी अंतर्गत चोरी केल्याचे समजले. चोरीतील मुद्देमाल शेख शाकेर शेख हुसेन (रा.सिद्धार्थ नगर, परभणी) यास विकल्याचे आरोपींनी सांगितले. त्यालाही ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून वीजतारा, मोटार व विक्रीतून मिळालेले रोख रक्कम असा एकूण ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, राजू मुत्येपोड, मधुकर चट्टे, अंमलदार निलेश भुजबळ, लक्ष्मण कांगणे, सूर्यकांत फड, रणजीत आगळे, केशव लटपटे, परसराम गायकवाड, उत्तम हनवते, सायबर सेलचे गणेश कौटकर यांनी संयुक्त केली.