Devendra Fadanvis On Wet Drought :
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विशेषकरून मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा आजपासून सुरू केला. ते आज (दि२४) सकाळी सोलापूरातील माढ्यातील पूर परिस्थितीची पाहणी सुरू केली. त्यावेळी बोलताना त्यांनी आम्ही शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. आम्ही मदत करताना हात आखडता घेणार नाही. अधिक निकष लावणार नाही. जिथं गरजेचं आहे तिथं निकष शिथील करण्याचे देखील आदेश दिले आहेत असं सांगितलं. यावळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी स्वतःहून संवाद साधला.
देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले, 'आम्ही शेतकऱ्यांना मदत करताना अधिकचे निकष लावणार नाही. जिथं गरज आहे तिथं निकष शिथील केले जातील. नागरिकांच्या सोयीचे सर्व निर्णय घेतले जातील. निर्णय घेताना पूरग्रस्त नागरिक केंद्रस्थानी ठेवण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.
दरम्यान, विरोधक राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करत आहेत. याबाबत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं म्हणणं मांडलं. त्यांनी ओला दुष्काळ ही आपल्या बोली भाषेतील टर्म आहे. आपण शेतकऱ्यांना सर्व सवलती देणार आहोतच. पहिल्यांदा तातडीची मदत देणं हा महत्वाचा विषय आहे. त्याप्रमाणं आम्ही पैसे रिलीज करणे देखील सुरू केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारही मदत करणार आहे. केंद्राने एनडीआरएफमध्ये अॅडव्हानमध्ये पैसे दिले आहेत ते वितरीत करत आहोत. मंत्रीमंडळात जो काही निधी लागेल तो देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं.
त्यांनी धरणातून केल्या जाणाऱ्या विसर्गाबद्दल देखील वक्तव्य केलं. ते म्हणाले, 'धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत सांगायचं झालं तर ज्यावेळी ढगफुटीसारखा पाऊस होतो. त्यावेळी नियमीत नियोजनानं पाणी सोडलं जाऊ शकत नाही. तरी पाणी सोडण्यात काही चूक झाली आहे का याची देखील चौकशी करू. केवळ धरणाचा विषय नाही. कॅचमेंट एरियात मोठा पाऊस झाला आहे. निसर्गाचा चक्र बदललं आहे. आपण याकडं लक्ष देत आहोत.'
देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरातील निमगाव इथं पाहणी दौरा केला. यावेळी तेथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना परिस्थितीची माहिती दिली. याचबरोबर निवेदन देखील दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सर्व प्रकारची मदत करणार आहोत असं अश्वासन दिलं. त्यांनी शेतीसाठी, गुरांसाठी, घरांसाठी आणि उद्योग-व्यवसायांसाठी देखील वेगवेगळी मदत करणार आहोत असं सांगितलं.
सोलापूरच्या विविध नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री जयकुमार गोरे, रणजीतसिंह नाईक निंबाळकर, सुभाष देशमुख देखील होते.