

Sanjay Raut Marathwada Rain Flood :
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मराठवाड्यात झालेल्या तुफानी पावसामुळं तेथील जवळपास ६० लाख एकर जमिनीवरील पीकं मातीसह वाहून गेल्याचं सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी पशुधन, घरांचं देखील मोठं नुकासन झालं असल्याचा दावा केला. याचा ३६ लाख शेतकऱ्यांना फटका बसलाय.
याचबरोबर संजय राऊत यांनी राज्यावर असलेल्या कर्जाचा उल्लेख करत किमान १० हजार कोटी रूपयांच्या मदतीची मागणी केली. त्यांनी राज्यावर ९ लाख कोटी रूपये कर्ज झाल्याचं देखील सांगितलं. ते म्हणाले की, पिशव्यांमधून मदत वाटायला सुरूवात झाली आहे. काय हा निर्लज्जपणा.... लोक मरत आहेत आणि हे प्रचार आणि राजकारण करत आहेत.
संजय राऊत यांनी समृद्धी महामार्गातून, कंत्राटदार यांच्याकडून पैसे घ्या असा सल्ला देखील राज्य सरकारला दिला. त्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप देखील केला.
संजय राऊत यांनी राज्याला विरोध पक्षनेता नाही यावरून देखील टोमणा मारला. ते म्हणाले, 'विरोध पक्षनेता अशावेळी लोकांमध्ये फिरत असतात. ते सरकारला सल्ला देत असतात. मात्र आवाज दाबण्यासाठी अमित शहा आणि इथल्या मंडळींना त्यांची नियुक्तीच केलेली नाही. लोकशाहीवर प्रवचन देता. मग दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसावा.
सरकारमधील अंतर्गत वादावर संजय राऊत यांनी बोट ठेवलं. ते म्हणाले, सरकारमध्ये साठमारी सुरू आहे. मात्र अधिकारी काय करत आहेत. गिरीश महाजन हे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत. यांच्या फाईलवर वजन ठेवल्याशिवाय फाईल पुढे जात नाही. यात कसा घोटाळा आहे हे मी सांगितलं होतं.
संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकरांबद्दल देखील वक्तव्य केलं. ते म्हणाले, 'ओमराजे निंबाळकर हे आमचे तरूण खासदार आहेत. ते तीन दिवसांपासून पाण्यात उतरून लोकांना मदत करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मदतीमध्ये जात धर्म काही आणायचा नाही अशी शिकवण दिली आहे.
दरम्यान, उद्या ठाकरेंच्या सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळ भागाची पाहणी करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर, संजय राऊत आणि अंबादास दानवे नेते असणार आहेत. ते धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगरचा दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरेंनंतर शरद पवार देखील मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.