

Beed flood farmer ended life news
नेकनुर: सततच्या पावसाने पिके तर गेलीच शिवाय मांजरा नदीच्या बाजूला असलेले आठ एकर पिकासोबत शेत देखील वाहून गेले. या आस्मानी संकटामुळे ओढावलेल्या आर्थिक विवंचनेतून केज तालुक्यातील बोरगाव बु. येथील शेतकऱ्यांने शेतातील विजेला स्पर्श करून जीवन संपवले. रमेश ज्ञानोबा गव्हाणे (वय - ६२ वर्षे) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतातील सोयाबीन सततच्या पावसाने कुजून गेले. शिवाय मांजरा नदीच्या पाण्याने नदीकाठची उत्पन्न देणारी जमीन देखील वाहून गेली. यामुळे आता पुढे काय करायचे? या प्रश्नाने व्यथित झालेल्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
नुकसानग्रस्त मृत शेतकरी रमेश गव्हाणे यांनी शेतात असलेल्या विजेच्या ट्रान्सफरला जाऊन स्पर्श करीत मंगळवारी (दि.२३) दुपारी त्यांची जीवनयात्रा संपवली. त्यांना केज उपजिल्हा रुग्णालयातून अंबाजोगाई रुग्णालयाकडे पाठवण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात पोहोचताच मयत घोषित केले. बुधवारी (दि.२४) अंबाजोगाई रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, बोरगाव येथे दुपारी त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे.