Human Skull And Bones Seized
मोहोळ : जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये अघोरी उपचार कृत्यात मोहोळ पोलीसांत गुन्हा दाखल झालेल्या भोंदूबाबाने अघोरी कृत्यात वापरलेली मानवी कवटी व हाडे त्याने कोठून आणली ? की नरबळी सारखे कृत्य त्याने यापूर्वी केले आहे का ? याची चौकशी करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चौकशीची मागणी निवेदनाद्वारे मोहोळ पोलीसांकडे केली आहे.
शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी मोहोळ येथे जादूटोणा विरोधी कायद्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये गणेश भांगे या बुवाने वापरलेली कवटी महिलेच्या समोर ठेवून त्या कवटी वरून दोन्ही हातातील हाडे फिरवून आग लावण्यात आल्याचा उल्लेख फिर्यादीत केला असून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सदर अमानुष कृत्यात वापरलेली कवटी व हाडे कोठून उपलब्ध केली ? त्याची चौकशी करण्यात यावी या बाबतचे निवेदन मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री.पाटील यांना देण्यात आले आहे. त्या निवेदनावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस सुधाकर काशीद, जिल्हा कार्याध्यक्ष धर्मराज चवरे, तालुका कार्याध्यक्ष श्रीधर उन्हाळे, तालुका कार्याध्यक्ष बिरमल खांडेकर आदींच्या सह्या आहेत. विठ्ठल सरवदे व दादा पवार उपस्थित होते.
मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील सुनिता सिद्धेश्वर उबाळे या महिलेवर व तिच्या पतीवर महिलेच्या माहेरच्या लोकांनी करणी केली आहे,असा खोटा विश्वास निर्माण करत 'करणी उतरवण्यासाठी ' संबंधित महिलेला बुवाकडे नेऊन तथाकथित केलेली करणी काढण्यासाठी पिवळ्या भातातून तिला जबरदस्तीने काहीतरी खाण्यास दिले, ज्यामुळे त्या महिलेला गुंगी आली.त्यानंतर गावाच्या बाहेरील विहीरीतील भुत लागले असून त्यावर उतारा करावा लागेल, असे सांगून अघोरी प्रथा व उतारे करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्या महिलेच्या पतीसह चार जणांवरती मोहोळ पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी घडली आहे.
याबाबत माहिती देताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस सुधाकर काशीद यांनी सांगितले की, 'मानवी हाडाची कवटी व इतर मानवी हाडे सदर भोंदूबाबाकडे आढळून आली आहेत. ही बाब गंभीर आहे.अघोरी उपचारासाठी त्याने त्यांचा वापर केला आहे. माढा तालुक्यात यापूर्वी नरबळीच्या घटना घडल्या आहेत.त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कदाचीत त्याने यापूर्वी अघोरी उपचारात केलेल्या इतर अमानुष नरबळी सारख्या गुन्ह्यांचाशोध यातून लागू शकतो.'
गणेश भांगे या भोंदू बुवा व त्यांच्या सहकाऱ्यांनी फिर्यादी व त्यांच्या पतीकडून रुपये १५ हजार रक्कम घेतली व फसवणूक केली. अशा आशयाची फिर्याद पिडीत महिला सुनिता उबाळे यांनी दिली असून त्यानुसार मोहोळ पोलिसांनी पिडीत महिलेचा पती सिद्धेश्वर नागनाथ उबाळे, बाळू धोंडीराम मोटे, निलाबाई संभाजी राऊत, तिघे रा.नरखेड, ता.मोहोळ व भोंदू बाबा गणेश भांगे,रा.माढा यांच्यावर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सिद्धेश्वर उबाळे व बुवा गणेश भांगे अशा दोघांना अटक करून मोहोळ येथील न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना २ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिले आहे. याबाबत अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.
"माढा येथील भोंदूबाबा गणेश भांगे याने करणी उतरविण्यासाठी केलेल्या अघोरी कृत्यात वापरलेली मानवी कवटी व हाडे त्याने कोठून आणली ? की त्याने नरबळी सारखे कृत्य यापूर्वी केले आहे का ? कारण प्रेताचा अंत्यविधी केल्यानंतर कवटीसह सर्व हाडे जळून राख होतात.मग पूर्ण मानवी कवटी व मानवी हाडे त्याच्याकडे कशी आली ? याची सखोल चौकशी पोलीसांनी करावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चौकशीची मागणी केली आहे. कदाचीत त्याने केलेल्या इतर अमानुष नरबळी सारख्या गुन्ह्यांचा शोध यातून लागू शकतो." - श्री. सुधाकर काशीद,राज्य सरचिटणीस ,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.