

मोहोळ: शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दोन मोबाईल शॉपींचे मागील बाजूचे पत्रे उचकटून चोरट्यांनी तब्बल १ लाख ८२ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या धाडसी चोरीमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेल्यानंतर, मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहोळ शहरातील मेन रोडवर शशिकांत दादाराव सादिगले यांची 'शिवानी मोबाईल शॉपी' आणि बाळासाहेब शिंगाडे यांची 'शिंगाडे मोबाईल शॉपी' आहे. सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास दोन्ही दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली आणि ते घरी निघून गेले.
मंगळवारी, १९ ऑगस्ट रोजी सकाळी जेव्हा ते दुकान उघडण्यासाठी आले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. दुकानाच्या मागील बाजूचे पत्रे उचकटलेले दिसले आणि दुकानातील मौल्यवान वस्तू गायब होत्या. पाहणी केली असता दोन्ही दुकानांमध्ये मोठी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी दोन्ही दुकानांमधून मोबाईल फोन, स्मार्टवॉच, एअरबड्स आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
घटनेची माहिती मिळताच दोन्ही दुकानदारांनी मोहोळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू केला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा माग काढत आहेत.
मोहोळ शहराच्या मुख्य बाजारपेठेत अशाप्रकारे धाडसी चोरी झाल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गेल्या काही काळापासून शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, या घटनांवर वेळीच नियंत्रण मिळवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.