

पोखरापूर : महिलेवर व तिच्या पतीवर महिलेच्या माहेरच्या लोकांनी करणी केली आहे, असा खोटा विश्वास निर्माण करत ती करणी उतरवण्यासाठी संबंधित महिलेला बुवाकडे घेऊन जावून केलेली करणी काढण्यासाठी काहीतरी खाण्यास दिले, ज्यामुळे त्या महिलेला गुंगी आली. त्यानंतर गावाच्या बाहेरील विहीरीतील भुत लागले असून त्यावर उतारा करावा लागेल, असे सांगून अघोरी प्रथा व उतारे करण्यास प्रवृत्त केले केल्याप्रकरणी त्या महिलेच्या पतीसह चार जणांवरती मोहोळ पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २९ ऑगस्ट रोजी घडली. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे सुनिता सिद्धेश्वर उबाळे या कुटुंबासमवेत राहण्यास आहेत. दि. २२ रोजी त्यांचे पती सिद्धेश्वर उबाळे, त्यांचा आतेभाऊ बाळू मोटे व नणंद निलाबाई राऊत यांनी एकत्र येऊन सुनिता व तिच्या पतीवर माहेरच्या लोकांनी करणी केली आहे, असा खोटा विश्वास निर्माण केला. त्यानंतर सदरची करणी उतरवण्यासाठी सुनिताला राहत्या घरातून जबरदस्तीने माढा महातपूर रोडवरील मंदिरात, गणेश भांगे या बुवाकडे घेऊन गेले.
तेथे उपस्थित गणेश भांगे व त्याचे सहकारी फिर्यादीचा पती, त्यांचा आत्याचा मुलगा व नणंद यांनी मिळून फिर्यादीच्या माहेरच्या लोकांनी केलेली करणी काढण्यासाठी त्यांना काहीतरी खाण्यास दिले, ज्यामुळे फिर्यादीला गुंगी आली. त्यानंतर गावाच्या बाहेरील विहीरीतील भुत लागले असून त्यावर उतारा करावा लागेल, असे सांगून अघोरी प्रथा व उतारे करण्यास प्रवृत्त केले. व गणेश भांगे बुवा व त्यांच्या सहकाऱ्यांनी फिर्यादी व त्यांच्या पतीकडून रुपये १५ हजार रक्कम घेतली व फसवणूक केली अशा आशयाची फिर्याद सुनिता उबाळे यांनी दिली आहे.
त्यानुसार मोहोळ पोलिसांनी त्यांचे पती सिद्धेश्वर नागनाथ उबाळे, बाळू धोंडीराम मोटे, निलाबाई संभाजी राऊत, तिघे रा. नरखेड, ता. मोहोळ व गणेश भांगे, रा. माढा महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सिद्धेश्वर उबाळे व बुवा गणेश भांगे अशा दोघांना अटक करून मोहोळ येथील न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना २ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिले आहे. याबाबत अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.