Biker husband dies on the spot after being hit by speeding car, wife seriously injured
कामती : राहुल सोनवणे :
मोहोळ तालुक्यातील वाघोली येथे सोमवारी (दि. ११ ऑगस्ट) सकाळी साडेनऊच्या सुमारास सोलापूर–कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव कारने दुचाकीवरील दाम्पत्याला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली.
या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव चेतन आवताडे (वय २४, रा. विरवडे बुद्रुक, ता. मोहोळ) असे आहे. चेतन व पत्नी कल्याणीसह सांगोला तालुक्यातील जवळा येथे सासरवाडीवरून परत येत असताना कोल्हापूरकडून सोलापूरकडे जाणाऱ्या (एमएच-०१ ए एच ४४७२) या कारने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी समोर चाललेल्या आयशर टेम्पोखाली गेली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चेतन यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात कल्याणी आवताडे गंभीर जखमी असून, त्यांना सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
चेतन आवताडे हे वाघोली येथील श्रीकृष्ण गुरुकुलमध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. ते श्रीकृष्ण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रमोद आवताडे यांचे चुलत भाऊ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.