मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागारांच्या बहिणींच्या जमीन नोंदणीस मंडल अधिकार्‍यांचा नकार

उ. सोलापूरमधील बेलाटी परिसरातील प्रकार; जिल्हाधिकार्‍यांचे चौकशीचे आदेश
Solapur News
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
Published on
Updated on

सुमीत वाघमोडे

सोलापूर ः मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांचे वडील प्रतापसिंह यांनी मुलगी प्रिया अजय चौहान यांना बक्षीसपत्र म्हणून दिलेल्या जमिनीवर नाव लावण्यासाठीची नोंद मंडल अधिकार्‍यांनी बेकायदा रद्द केली. हे उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंडल अधिकार्‍यांची चौकशी लावली. प्रांताधिकारी, तहसीलदारांच्या अहवालात मंडल अधिकारी दोषी आढळल्याने जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई का केली नाही? असा सवाल व्यक्त होत आहे.

प्रतापसिंह परदेशी यांची उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी आणि परिसरातील गावात शेतजमीन आहे. यातील पाथरी हद्दीतील 40 आर जमीन प्रतापसिंह यांनी मुलगी प्रिया अजय चौहान यांच्या नावे बक्षीसपत्र करून दिली. त्या जमिनीच्या उतार्‍यावर चौहान यांचे नाव लावण्यासाठी त्यांनी तलाठ्याकडे अर्ज सादर केला. तलाठ्यांनी तो अर्ज मंजूर करून वरील मंजुरीसाठी मंडल अधिकारी विजय माने यांच्याकडे सादर केला. यानंतर मंडल अधिकारी माने यांनी ही जमीन मिळकत वर्ग क्र. दोन असून, तहसीलदारांचा गट रीलिजचा अर्ज नसल्याचे कारण देऊन नोंद नामंजूर केली. या नोंदीच्या नामंजुरीनंतर चौहान यांनी मंडल अधिकारी माने आणि तहसीलदार यांच्याविरोधात प्रांताधिकारी कार्यालयाकडे दावा दाखल केला.

प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी तपासणी केली असता मंडल अधिकारी यांनी बेकायदा नोंद नामंजूर केली असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रांताधिकार्‍यांनी चौहान यांचा दावा मंजूर करीत नोंद अधिकृत करण्याचे आदेश देत मंडल अधिकारी मानेंवर आठ अन्वये चौकशी प्रस्तावित केली. त्यावर तहसीलदारांनी पुन्हा चौकशी केली, यामध्ये मंडल अधिकारी माने यांच्या कामाबात अनेक त्रुटी आढळून आल्या. त्याबाबत तहसीलदारांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे अहवाल पाठविला. त्यानंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मंडल अधिकारी माने यांच्यावर 10 अन्वये चौकशीचे आदेश पारीत केले. परंतु माने यांच्यावरील आरोप आणि त्यांनी केलेल्या बेकायदा कामांचा अहवाल प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी दिला असताना त्यांना तात्काळ निलंबित करून चौकशीचे आदेश का दिले नाहीत असा सवाल सर्वसामान्यांमधून विचारला जातोय. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

तात्काळ निलंबन का नाही?

मंडल अधिकारी विजय माने यांनी कोणता हेतू ठेवून ही नोंद रद्द केली याची चर्चा सध्या महसूल प्रशासनात आहे. प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या अहवालानंतर जिल्हाधिकार्‍यांनी थेट अ‍ॅक्शन घेण्याची आवश्यकता होती, मात्र कागदोपत्री प्रोसिजरचे नाव देऊन मंडल अधिकारी माने यांना आठ महिन्यापासून अभय देण्यात आले. त्यांचे तात्काळ निलंबन करून नंतर चौकशी का लावण्यात आली नाही असा सवाल केला जात आहे.

घटनाक्रम

- प्रतापसिंह रघुनाथसिंह परदेशी यांनी त्यांची मुलगी प्रिया अजय चौहान यांना 11 ऑगस्ट 2024 रोजी पाथरी येथील गट क्रमांक 252/1 मधील 40 आर शेतजमीन बक्षीसपत्र करून दिली.

- पाथरी तलाठी यांनी ही नोंद मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी मंडल अधिकारी विजय माने यांच्याकडे वर्ग केली.

- मंडल अधिकारी माने यांनी गट रिलीजचा आदेश नसल्याचे कारण देऊन नऊ ऑक्टोंबर 2024 रोजी नोंद नामंजूर केली.

- प्रिया चौहान यांनी या निर्णयाविरोधात प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांच्याकडे अपील दाखल केले.

- प्रांताधिकार्‍यांनी चौकशी करून 18 फेब्रुवारी 2025 रोजी चौहान यांच्या बाजूने निकाल दिला आणि, मंडल अधिकारी माने यांच्या चौकशीची शिफारस केली.

- प्रांताधिकार्‍यांच्या आदेशाने उत्तर सोलापूर तहसीलदारांनी जिल्हाधिकार्‍यांकडे मंडल अधिकारी माने यांच्या चौकशीचा अहवाल पाठविला.

- जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी 14 जुलै 2025 रोजी मंडल अधिकारी माने यांच्या विरोधात 10 अन्वये चौकशीचे आदेश दिले.

मंडल अधिकार्‍यांच्या विरोधात अहवालातील ठळक मुद्दे

- मंडल अधिकारी माने यांनी नोंद रद्द करतेवेळीे अर्जदारांना नोटीस दिली नाही.

- गट रिलीजचा आदेश तहसीलदारांनी दिल्यानंतर त्याचा अभिलेख तलाठी कार्यालयात उपलब्ध असतो. त्याची कोणतीही पडताळणी माने यांनी केली नाही.

- माने यांनी महसूल कायद्यातील कोणत्याही तरतुदींचा अभ्यास न करता नोंद चुकीच्या पद्धतीने तसेच बेकायदा रद्द केली आहे.

- माने यांची दर महिन्याची दैनंदिनी पाच तारखेपूर्वी तयार करून पडताळणी केली नाही तसेच तहसीलदारांकडे पाठविली नाही. तलाठी दप्तर तपासले नाही व अद्ययावत केले नाही.

- मळई जमिनीची नोंदवही ठेवण्यात आलेली नाही. अतिक्रमणाची पडताळणी नाही. कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केला. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 नियम तीनचा भंग केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news