

‘जीआय’ मानांकनाचे महत्त्व काय?
- उत्पादनास कायदेशीर संरक्षण मिळते.
- बनावट उत्पादनांपासून संरक्षण मिळते.
- स्थानिक उत्पादकांना आर्थिक लाभ मिळू शकतो.
- निर्यातीस चालना मिळते.
Solapur Special Jowar Bajra Kadak Bhakri
अजित बिराजदार
सोलापूर : महाराष्ट्रातील पहिले ‘जीआय’ मानांकन सोलापूर चादर व टेरी टॉवेलने मिळविले आहेच. आता सोलापूरच्या ज्वारी आणि बाजरीच्या कडक भाकरीला ‘जीआय’ मानांकन मिळावे, असे प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच्या काही प्रक्रिया नुकत्याच मार्गी लागल्या आहेत. असे मानांकन मिळाले तर सोलापूरची कडक भाकरी जगात भाव मिळवेल.
फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट असोसिएशन यांच्याकडे सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि बचत गटांच्या माध्यमातून ज्वारी आणि बाजरीच्या कडक भाकरीस जीआय मानांकन मिळण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यावर फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट असोसिएशने सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. या सर्वांच्या प्रयत्नातून लवकरच सोलापूरच्या ज्वारी आणि बाजरीच्या कडक भाकरीला लवकरच जीआय मानांकन मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे.
जागतिक व्यापार कायद्यानुसारची ‘जीआय’ मानांकन प्राप्त उत्पादने जगात आपला ठसा उमटवितात. गुणवत्तापूर्ण मानांकन मिळाल्यास त्या शहराला व उत्पादनाला जागतिक पातळीवर ओळख मिळते. याविषयी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी म्हणाले, सोलापूरच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेची दारे खुली आहेतच. ‘जीआय’ मानांकनातून त्या उत्पादनाची ओळख जागतिक पातळीवर होते. यासाठी ‘जीआय’ मानांकन महत्त्वाचे आहे. जागतिक व्यापार कराराचा भाग म्हणून देशभरातील अनेक उत्पादनांना ‘जीआय’ मानांकन प्राप्त झाले आहे.
‘जीआय’ मानांकन ही विशिष्ट प्रदेशाशी संबंधित उत्पादनाचे संरक्षण करते. हे उत्पादन बौद्धिक संपदा हक्क स्पष्ट करते. पारंपरिक ज्ञान, निसर्ग व सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे ते इतरांपेक्षा वेगळे असते. हे उत्पादन किमान काही वर्षे त्या भागात बनवले जात असावे. यासाठी संस्था स्थापन करावी. कोणीही वैयक्तिक अर्ज करू शकत नाही. यासाठी चेन्नईमधील जिओग्राफीकल इंडिकेशन्स रजिस्ट्री येथे अर्ज सादर करावा लागतो. यात उत्पादनांचे ऐतिहासिक सांस्कृतीकसंदर्भ द्यावे लागतात. त्यानंतर‘जीआय’ नोंदणी कार्यालयाकडून संपूर्ण चौकशी होते. आक्षेप मागविले जातात. यानंतर नोंदणी प्रमाणपत्र मिळते. ते पुढील दहा वर्षांसाठी वैध असते.
महाराष्ट्रात एकूण 32 उत्पादनांना ‘जीआय’ टॅग मिळालेला आहे. यात 26 कृषी उत्पादने आहेत. सहा हस्तकला व एक वाईन उत्पादन आहे. सोलापुरी चादर, टेरी टॉवेल, पुणेरी पगडी, पैठणी साड्या व कापड, सावंतवाडीची लाकडी खेळणी, नाशिकची वाईन उत्पादने, हुपरीची चांदीची हस्तकला यांना जीआय मानांकन प्राप्त आहे. मिरज येथील सितार व तानपुरा या संगीतवाद्यांना जून 2025 मध्ये ‘जीआय’ मानांकन प्राप्त झाले.
कोकणचा हापूस, कोकम, सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला काजू, महाबळेश्वरची स्ट्राबेरी, कोल्हापूरचा गूळ, आजरा येथील घानसाळ तांदूळ, पानचिंचोळी तांदुळी, लातूरची तुरडाळ, जालना येथील स्थानिक धान्य, नंदूरबारची मश्रुम उत्पादने.