सोलापूर : आ. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ताशरणू हांडे याचे आ. रोहित पवार यांचा समर्थक असलेल्या अमित सुरवसे याने साथीदारांच्या मदतीने अपहरण करून खुनाचा प्रयत्न केला. त्यानंतर तातडीने सोलापुरात दाखल झालेल्या आ. पडळकरांनी आ. पवारांना थेट चॅलेंज देत कार्यकर्त्यांमध्ये भांडणे लावण्यापेक्षा मला बोलवा. मी बारामतीत येतो. ठिकाण आणि वेळ तुम्हीच सांगा, मी हजर असेन, असे आव्हान दिले.
आपला कार्यकर्ता शरणू हांडे याचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची घटना समजल्यानंतर आ. पडळकर शुक्रवारी सोलापुरात आले. घटनेची सविस्तर माहिती घेत आपला कार्यकर्ता हांडेच्या मारेकर्यांवर कडक कारवाई करावी. यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा, या मागणीसाठी आ. पडळकरांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
दरम्यान, आ. पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडे याने आरोपी अमित सुरवसे याला मारहाण करीत त्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. याचा बदला घेण्यासाठी अमित सुरवसेने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.
पूर्व वैमन्यस्यातून गुरूवारी सायंकाळी अमितने मित्रांसह हत्याराचा धाक दाखवत शरणू हांडेचे अपहरण केले. पोलिसांनी चार तासात अपहरणकर्त्याची सुटका केली. अपहरण करून खुनाचा प्रयत्न करणे यासह इतर कलमे अमितसह त्याच्या मित्रांना लावण्यात आली आहेत.एम. राजकुमार, पोलीस आयुक्त
अमित सुरवसे (वय 29, रा. मणिधारी सोसायटी), सुनील भीमाशंकर पुजारी (वय 20, रा. साईबाबा चौक), दीपक जयराम मेश्राम (वय 23, रा. आशा नगर) आणि अभिषेक गणेश माने (वय 23, रा. एकता नगर) यांना या प्रकरणी अटक करण्यात आली. घटनेत त्यांनी वापरलेली गाडी, दोन कोयते, हॉकी स्टीक यासह साडी, फटाक्यांची माळ, कंडोम आणि ट्रायपॉड जप्त केले.
या प्रकरणातील संशयित आरोपी अमित सुरवसे, सुनील पुजारी, दीपक मेश्राम आणि अभिषेक माने यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. परंतु आरोपीचे वकील शरद पाटील यांनी त्यास विरोध करीत सर्व पुरावे हाती असल्याने न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायमूर्ती व्ही. ए. कुलकर्णी यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली.