

सोलापूर : सोलापुरातील रक्तदानाची चळवळ बदनाम होण्यास रक्तपेढ्यांकडून देण्यात येणारी महागडी गिफ्ट कारणीभूत असल्याचं समोर आलंय. रक्तदानाची संख्या वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आमिषेही दाखविण्यात येतात. याला महा ब्लड सेंटर असोसिएशननेही दुजोरा दिला आहे. गिफ्ट देणार्या रक्तपेढ्यांवर जुजबी कारवाई करून एफडीएचे अधिकारी स्वतःचा स्वार्थ साधत असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
सोलापुरातून रक्ताची आणि प्लाझ्माचीही मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची बाब ‘पुढारी’च्या स्टींग ऑपरेशनमधून उघड झाली आहे. देशातील काही राज्यात रक्ताची तसेच हैदराबादमधील औषध कंपन्यांना हा प्लाझ्मा पाठविण्यात येत आहे. सोलापूर परिसरातील काही रक्तपेढ्या रक्ताची तस्करी करण्यास हातभार लावत आहेत. रक्त, प्लाझ्माच्या तस्करीमधून करोडो रुपयांचा नफा या तस्कर आणि रक्तपेढ्यांना होतोय. त्यामुुळे रक्तपिशव्यांची संख्या वाढविण्यासाठी रक्तपेढ्या वेगवेगळ्या प्रकारे आमिषे दाखवत असल्याचे समोर आलेय. रक्तदान शिबीरावेळी रक्तदात्यांना पाचशे रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंतचे महागडे गिफ्ट देण्याचा नवा फंडा या रक्तपेढ्यांनी गेल्या काही वर्षापासून सुरू केलाय.
महागडी गिफ्ट पाहून रक्तदात्यांची संख्याही वाढत आहे. या महागड्या वस्तू देऊन रक्त काढून घेण्याचा तस्करांचा फंडा म्हणजे आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार असल्याचे ‘पुढारी’च्या स्टींग ऑपरेशनमधून स्पष्ट होत आहे. राज्यातील रक्तपेढ्यांची संघटना समजल्या जाणार्या महा ब्लड सेंटर असोसिएशनने देखील सोलापुरातील काही रक्तपेढ्या महागडी गिफ्ट देत असल्याचे कबूल केले आहे. अशा रक्तपेढ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी आम्ही त्यांचे समर्थन करणार नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ. जीवन सगरे यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले. या महागड्या गिफ्टमुळे सोलापुरातील रक्तदानाची चळवळ बदनाम होत आहे.
महागड्या गिफ्टचा फंडा
सोलापुरातील काही रक्तपेढ्या अनेक वेगवेगळी गिफ्ट देत असल्याचे शिबिराच्या बॅनवर छापण्यात येते. रक्तदान करा आणि गिफ्ट घरी घेऊन जा अशा पद्धतीच प्रचार सोशल मिडीयातून देखील करण्यात येतो. रक्तपेढ्या रक्तदान शिबीरावेळी पाण्याचे जार, जर्कींग, रेनकोट, ट्रॅव्हल बॅग, स्कूल बॅग, इअरबड्स, पॉवर बँक, छोटा कुकर, डिनर सेट, चांदीचा गणपती आदींसह इतर महागडी गिफ्ट देतात. या गिफ्टसाठी वेगळी गाडी त्यांच्याकडे तयार असते. रक्तदान केल्यानंतर प्रमाणपत्र पाहून गिफ्ट देण्यात येते.
घरोघरी जाऊन रक्त घेत आहेत विकत
रक्तपेढ्यांना रक्तदानासाठी रक्तदान शिबिरावर अवलंबून रहावे लागते. जास्तीत जास्त शिबिरे मिळविण्यासाठी त्यांच्या स्पर्धाही सुरू आहे. जास्तीत जास्त महागडे गिफ्ट देऊन शिबिर मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. या वाढत्या स्पर्धेची चर्चा होऊ लागली. आता रक्तपेढ्या डोअर टू डोअर जाऊन पैसे देऊन रक्त विकत घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एमआयडीसी, विडी घरकुल, सुनील नगर परिसरात घरोघरी जाऊन पाचशे ते सातशे रुपये देऊन रक्तदान करून घेतले जात आहे.
अधिकार्यांचे अक्षम्य दुर्लक्ष
सोलापुरात रक्त आणि प्लाझ्माची तस्करी होत असल्याचे दै. ‘पुढारी’ने उघडकीस आणल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. राज्यातील रक्तपेढ्या आणि त्यांच्या ग्रुपमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मानवतेच्या या कामाचा तस्कर आणि काही रक्तपेढ्यांनी धंदा बनविला आहे. परंतु, या गंभीर प्रकाराकडे सोलापुरातील वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे दीर्घकाळ रजेवर आहेत. प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम हे यावर बोलायला तयार नाहीत, तर अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अरुण गोडसे हेदेखील रजवेर गेले आहेत.