

सोलापूर : महापालिकेच्या टॅक्स थकबाकीदारांच्या विरोधात महापालिकेचा करसंकलन विभाग अॅक्शन मोडवर आला आहे. नोटिसा देऊन थकबाकी न भरणार्या मिळकतदारांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याचा निर्णय नियुक्त केलेल्या समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली. 191 थकबाकीदारांच्या सातबारांवर बोजा चढविण्याची प्रक्रिया चालू आहे, तर 17 मालमत्ता विक्री करण्याची हालचाली आहेत.
शहर-हद्दवाढ भागात मोठ्या प्रमाणात थकबाकीदार आहेत. यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षेतेखाली एक समिती गठित करण्यात आली होती. समितीची बैठक गुुरुवार, दि. 7 ऑगस्ट रोजी झाली. समितीच्या बैठकीमध्ये एक हजार मिळकतदारांची यादी तयार करण्यात आली. यामध्ये 191 थकबाकीदारांची नावे बोजा चढवण्यासाठी फायनल करण्यात आली. या सर्व मिळतदारांना एक नोटीस देऊन अंतिम आठ दिवसाची मुदत दिली जाणार आहे. दिलेल्या मुदतीमध्ये थकबाकी न भरल्यास या थकबाकीदारांच्या मालमत्तेवर महापालिकेचा बोजा चढवला जाणार आहे. मोठ्या प्रमाणात थकबाकीदार असल्याने महापालिकेचा मोठा महसूल बुडत आहे. या विरोधात महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर येत कारवाई करत आहे. यामध्ये अनेक थकबाकीदार असल्याचे दिसत आहे.
बोजा चढवण्याच्या प्रक्रियेस गती मिळणार
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने ही समिती गठित करण्यात आली आहे. विविध शासकीय अधिकार्यांचा समावेश आहे. या विभागांनी समन्वयक ठेवत सात बारा अथवा मिळकत पत्रिकेवर बोजा चढवण्याच्या प्रक्रियेस गती देणार आहे. यामध्ये महापालिका आयुक्त अध्यक्ष आहेत. भूमिअभिलेक जिल्हा अधिक्षक सह अध्यक्ष, प्रात एक, महापालिकेचे उपायुक्त, उत्तर सोलापूर उपअधिक्षक, उत्तर तहसिलदार, नगर भूमापन अधिकारी सदस्य तर महापालिकेचे करसंकलन अधिकारी सचिव आहेत.