कासेगाव : शेतकर्यांचा लाडका सण म्हणजे बैलपोळा. श्रावणातील हा प्रमुख सण असून आज शुक्रवार, 22 ऑगस्ट रोजी (तर काही ठिकाणी स्थानिक मान्यतेनुसार शनिवारी 23 ऑगस्ट 2025 रोजी ) हा रंगीबेरंगी उत्सव आनंदात साजरा होणार आहे. पोळ्याच्या आदल्या दिवशी होणार्या खांदे मळणी विधीने या सणाची सुरुवात झाली.
या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना स्वच्छ धुऊन त्यांच्या खांद्यावरील मळ, माती व घाम स्वच्छ करतात. लोणी व हळदीच्या मिश्रणाने, मोळ वनस्पतीच्या साहाय्याने बैलांच्या खांद्याची मालिश केली जाते. या वेळी ज्वारी व गुळापासून तयार केलेला खिचडा त्यांना खाऊ घातला जातो. या विधीमागे बैलांच्या श्रमाचे कौतुक व त्यांना विश्रांती देण्याचा भाव दडलेला असतो.
पूर्वीच्या काळी शेतीत बैलांचे महत्त्व अनन्यसाधारण होते. नांगरणी, वाहतूक, मशागत, मोट चालवणे, गाडागाडी ओढणे, शेतीकाम अशा सर्व ठिकाणी त्यांचा मोठा वाटा असे. विशेषत: उसाच्या हंगामात बैलगाड्यांवर उसाची वाहतूक करून कारखान्यापर्यंत नेण्यात त्यांचा प्रचंड सहभाग होता. मात्र या प्रवासात डोंगर-दर्या, चिखल, उन्हाचा तडाखा, थंडीचे चटके आणि किलोमीटरचा प्रवास अशा यातना बैलांना सहन कराव्या लागत. गोड साखरेमागील ही कडू कहाणी मात्र क्वचितच कुणाला दिसली.
आजच्या आधुनिक शेतीत ट्रॅक्टर, ट्रक आणि यंत्रसामग्री आल्याने बैलांचा वापर कमी झाला आहे. आता ते प्रामुख्याने पोळ्याच्या निमित्ताने सजवले जातात व त्यांची पूजा केली जाते. तरीही शेतकरी आपल्या शेतमित्राचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपतो.
पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना स्वच्छ आंघोळ घालून त्यांना रंगवले जाते. झूल, बेगड, वेंगुळ, गळपट्टा, घुंगरूमाळा अशा पारंपरिक अलंकारांनी त्यांची सजावट केली जाते. त्यांच्या अंगावर विविध नक्षी व घरातील लहानग्यांची नावे काढली जातात. पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. त्यानंतर गावभर मिरवणूक काढली जाते. वाद्यांच्या गजरात, पारंपरिक गाणी व नृत्यांच्या तालावर बैलांचे स्वागत करण्यात येते. सुवासिनी पंचारती, हळदकुंकू, साखर, धने, साळी घेऊन बैलांची मनोभावे पूजा करतात.
हा सण म्हणजे शेतकर्यांच्या संस्कृतीतील कृतज्ञतेचा दिवस. पोळा केवळ बैलांचा सन्मान नाही तर शेतकर्याच्या जगण्यातील आनंद, परंपरेतील अभिमान आणि संस्कृतीच्या जतनाचे प्रतीक आहे. मात्र, आधुनिकतेशी ताळमेळ साधत ही परंपरा टिकवणे, हा आजच्या शेतकर्यांसमोर मोठा प्रश्न आहे.