

सोलापूर ः सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी गृहनिर्माणासाठी राखून ठेवलेल्या जागेतील रस्ता आणि ओपन स्पेसची बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विक्री केल्याप्रकरणी 22 जणांविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव राजाराम गरड ( वय 75, रा. कुर्डूवाडी, ता. माढा) यांनी फिर्याद दिली आहे.
डीसीसी बँक कर्मचारी गृहनिर्माण संस्थेची भोसरे ता. माढा येथे पावणेपाच एकर जमीन आहे. या जमिनीवर सभासंदाना प्लॉटचे वाटप करण्यासाठी ले आउट पाडण्यात आले आहे. यामध्ये रस्ते आणि ओपन स्पेस सोडून इतर क्षेत्र सभासदांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यातील आरोपींनी संस्थेची खोटी मिटींग दाखविली. बनावट व खोटी मोजणी करून बनावट नकाशा तयार केला त्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख माढा यांची बनावट सही आणि शिक्का मारला. खरेदी खतावेळी तो खरा म्हणून वापरून प्लॉटधारकांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या जागेतील पाच हजार 747 चौ.मी. म्हणजेच सुमारे सव्वा एकर जमीन रस्ते आणि ओपन स्पेस होती ती 22 आरोपींनी स्वतःच्या नावे खरेदी करून घेतली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी करीत आहेत.