देगाव येथील अंगणवाडी सेविकेला फॉर्म भरताना आला हृदयविकाराचा झटका  Pudhari Photo
सोलापूर

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे फॉर्म भरून घेताना अंगणवाडी सेविकेचे निधन

देगाव येथील अंगणवाडी सेविकेला फॉर्म भरताना आला हृदयविकाराचा झटका

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील देगाव (वा) येथील अंगणवाडी क्रमांक: १ च्या सेविकेचे शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरण्याचे काम करत असताना अंगणवाडीतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आज (बुधवार) सकाळी ११ वाजता ही घटना घडली. सौ. सुरेखा रमेश आतकरे (वय ४८) असे त्यांचे नाव आहे.

कामावरतीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचा स्वभाव अत्यंत सृजनशील आणि शांत स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. शासनाकडून या निराधार झालेल्या कुटूंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

सध्या शासनाच्या ग्रामविकास विभागातील शिक्षक असो की, महिला व बाल कल्माण कर्मचाऱ्यांवर इतर कामाचा प्रचंड ताण आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या कामापेक्षा अशैक्षणिक कामे जास्त आहेत. याबाबत शिक्षक संघटना आणि अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी वारंवार मोर्चे निवेदने दिली आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत गावपातळीवरील विविध प्रकारचे सर्वे करावे लागतात. अतिरिक्त कामाचा सततचा ताण या कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे.

गावोगावच्या अंगणवाडी सेविकांवर मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा सर्वे करून फॉर्म भरण्याची जबाबदारी राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांवर दिलेली आहे. त्यामुळे गावोगावच्या अंगणवाडी सेविका गावात घरोघरी फिरून 'नारी दूत' या ॲपवरून फॉर्म भरून देत आहेत. देगाव (वा) ता. मोहोळ येथील अंगणवाडी क्रमांक : १ येथे मृत सुरेखा आतकरे या अंगणवाडी सेविका गावात फॉर्म भरत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्या खुर्चीत कोसळल्या.

मदतनीस या किचनमध्ये भांडी स्वच्छ करत होत्या. जोराचा आवाज झाला म्हणून घाबरून त्या आत आल्या असता अंगणवाडी सेविका सुरेखा आतकरे या खूर्चीत निपचीत पडल्याचे त्यांना दिसले. त्यांना तत्काळ मोहोळ येथील सरकारी दवाखान्यात आणले आणि डॉक्टरांनी तपासणी करून तपासणी पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. शवविच्छेदनानंतर या घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यांच्या निधनामुळे देगाव गावावर शोककळा पसरली आहे.

"अंगणवाडी कर्मचारी सेवा निवृत किंवा अपघाताने तसेच कामावर अकस्मात मृत्यू झाल्यास त्यांना शासनाने विमा उतरवलेल्या विमा कंपनी कडून १ लाख रुपये मिळतात. या योजने अंतर्गत मृत सुरेखा आतकरे यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपये देण्यात येतील."
किरण सुर्यवंशी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, मोहोळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT