सोलापूर

सोलापूर : सुरत-चेन्नई महामार्गाच्या मोबदल्यासाठी रयत क्रांती संघटना आक्रमक; रास्‍ता राेकाे आंदाेलन

निलेश पोतदार

सोलापूर ; पुढारी वृत्‍तसेवा रिंगरोड व सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवेवरील बाधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना योग्य मोबदला मिळण्यासाठी सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उळे येथे रयत क्रांती रिंग रोड संघर्ष समितीच्या वतीने आज (सोमवार) सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन केले.

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्‍ड हायवे आणि सोलापूर रिंग रोड या राष्ट्रीय महामार्गामधील भू संपादन सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या बाधित शेतकऱ्यांना मोबदला रकमेची नोटीस मिळाली असून, ती अतिशय अल्प रक्कम दर्शवण्यात आली आहे. यामुळे सोमवारी सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील उळे येथे रयत क्रांती संघटना आणि तांदुळवाडी केगाव रस्ता बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रयत क्रांतीचे जिल्ह्याचे नेते दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या हायवे लगत जमिनीचे जे चालू दर आहेत, त्याच्या चारपटीने ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा मोबदला हा चार पटीने देण्यात यावा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत शेतकरी वर्गाचे मानसिक शारीरिक आणि आर्थिक नुकसान झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला.

या आंदोलनात अमोल वेदपाठक, शिवानंद सावळगी, परमेश्वर गाढवे, महेश भोज, विक्रम गाढवे, श्रीशैल भोज, सचिदानंद चौगुले, हरी चौगुले, चंद्रकांत चव्हाण, काशिनाथ गाढवे, चंद्रकला वेदपाठक, तनुजा मुळे, शांताबाई गाढवे, यशपाल वाडकर, भिवा शिंदे, उषाबाई गाढवे, यशोदा शिंदे आदीसह उळे कासेगाव धोत्री खडकी, तामलवाडी, देव कुरळी, चपळगाववाडी, दुधनी मैंदर्गी यासह दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील गावकरी, शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT