Ajit Pawar: ‘बीआरएस’ पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार पण…:अजित पवार म्हणाले | पुढारी

Ajit Pawar: 'बीआरएस' पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार पण...:अजित पवार म्हणाले

पुढारी ऑनलाईन डेस्क: प्रत्येक पक्षाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव आपल्या बीआरएस पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करत आहेत. त्यासाठी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू आहे. परंतु, प्रचंड महागाई असताना जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. जाहिरातीसाठी इतका पैसा कोठून आणला जातोय, असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (दि.१०) पत्रकारांशी बोलताना केला.

अजित पवार पुढे म्हणाले की, याआधी महाराष्ट्रात बसपाच्या मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. तर भाजप आणि शिंदे गटाची युती आहे. त्यामुळे या सर्व पक्षांमध्ये आपल्याला राजकीय स्पेस मिळणार नाही, त्यामुळे असे अनेक नेते बीआरएस पक्षात जातील, अशी शक्यता पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाकडील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात आल्याचे पवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता ज्या पक्षाकडे जास्त जागा त्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद दिले जाते, असे सूचक विधान पवार यांनी यावेळी केले.

Ajit Pawar : राज्यात विकासकामे करण्यापेक्षा जाहिरातीबाजीवर खर्च

राज्यात विकासकामे करण्यापेक्षा जाहिरातीबाजीवर पैसे खर्च केले जात आहेत. महागाई कमी करण्याऐवजी मोठ्या- मोठ्या जाहिरातींचे फलक लावले जात आहेत. जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे, असा आरोप यावेळी पवार यांनी शिंदे सरकारवर केला.
पावसाला उशीर झाल्याने राज्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. धरणांनी तळ गाठल्याने पिके करपू लागली आहेत. टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. पावसाला उशीर झाल्याने राज्यातील साखर कारखाने उशीरा चालू होणार आहेत. परंतु कारखाने कधी सुरू करायचे याचा सर्वस्वी अधिकार राज्य सरकारला आहे,असेही पवार म्हणाले.

बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांची ही कृती त्यांना आवडलेली नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मला बीग बी म्हणाल्या बद्दल त्यांना धन्यवाद, असे पवार म्हणाले. उन्हाच्या तडाख्यामुळे राज्यातील वज्रमूठ सभा पुढे ढकलल्या आहेत, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button