सोलापूर

दैनिक पुढारी इम्पॅक्ट : प्रहार आणि पोलिसांच्या मध्यस्थीने शेतकऱ्याला मिळाला न्याय

मोहन कारंडे

जेऊर; पुढारी वृत्तसेवा : केम (ता. करमाळा) येथील विकास जाधव या मजूर शेतकऱ्याला अखेर त्याने ट्रॅक्टर खरेदी करताना दिलेली रक्कम परत मिळाली आहे. नवीन घेतलेला ट्रॅक्टर महिन्याभरातच नादुरूस्त झाल्याने विकास यांनी ट्रॅक्टर बदलून मिळावा, अशी मागणी शोरूमकडे केली होती. अन्यथा अमरण उपोषण करून आत्मदहन करण्याचा इशाराही त्याने दिला होता. सदर वृत्त 'दैनिक पुढारी' मध्ये प्रसिध्द झाले, त्यानंतर प्रहार आणि पोलिसांच्या मध्यस्थीने जाधव यांना न्याय मिळाला आहे.

विकास जाधव यांनी काही दिवसांपूर्वी टेंभूर्णी (ता. माढा) येथील श्रीराम ऑटोलाईन या शोरुममधून प्रीत कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी केला होता. मात्र ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर अवघ्या महिन्याभरात त्यात बिघाड झाला. त्यानंतर त्यांनी तो ट्रॅक्टर बदलून द्यावा, अशी विनंती शोरुमकडे केली. मात्र शोरुमने ट्रॅक्टर बदलून दिला नाही. त्यानंतर २७ जानेवारी २०२३ रोजी रात्री उशिरा ट्रॅक्टरने पेट घेतला आणि त्यात तो ट्रॅक्टर जळून खाक झाला. विकास जाधव यांनी तो ट्रॅक्टर शोरुमला आणून लावला आणि बदलून देण्याची मागणी केली. मात्र शोरुम चालक देवकर यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर सदरचे वृत्त २४ एप्रिल रोजी 'दैनिक पुढारी' मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर शोरुम चालकाला आणि ट्रॅक्टर मालक जाधव यांना टेंभुर्णी पोलीस प्रशासनाचे एपीआय ओंबासे, पीएसआय सोनटक्के आणि प्रहार जनशक्ती संघटनेच्या मध्यस्थीने जाधव यांना त्यांनी भरलेले पैसे आणि त्यांच्या ट्रॅक्टरवर असलेले फायनान्सचे कर्ज नील करून देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर संबंधित शोरुम चालकाने जाधव यांची रक्कम परत केली. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ता म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, डॉ. विपुल गोरे, युनूस पठाण, महावीर तळेकर, अच्युत पाटील, विष्णू अवघडे आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या महिन्यापासून सुरू असलेला संघर्ष अखेर थांबला, प्रहार जनशक्ती संघटनेच्या आणि पोलिसांच्या मध्यस्थीने आज मला न्याय मिळाला, मी सर्वांचा मनापासून ऋणी राहील.
– विकास जाधव, शेतकरी

गरीब गरजू जे शेतकरी किंवा ज्या नागरिकांना मदतीची गरज आहे, त्यांनी प्रहार संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला भेटून मदत मागावी. आम्ही सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. विकास जाधव या मजूर शेतकऱ्याला आज सर्वांच्या मदतीने न्याय मिळाला ही अतिशय चांगली गोष्ट आहे.
– संदीप तळेकर, तालुकाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT