सोलापूर: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार विभागाचे उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी तसेच जनकल्याण मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटीचे प्रमुख राजेंद्र हजारे यांच्यासह तिघांविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हजारे यांना अद्यापपर्यंत अटक केली नसली तरी चौकशी सुरु केलेली आहे.
याबाबत अमृत केशव पडवळे (वय 35, रा. 336, रामपूर, खेडपाडा, ता. डहाणू, जि. पालघर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अमर विजय जाधव (रा. 56/1502, सी वूड इस्टेट, नेरूळ, नवी मुंबई), यशवंत वसंतराव पाटील (रा. बी/501 डी विंग, ऑर्चिड मेट्रो पोलीस, एस. जी. बर्वे मार्ग, अलीदादा इस्टेट, कुर्ला, मुंबई), राजेंद्र पुंडलिक हजारे (रा. लोकमंगल विहार, पाण्याच्या टाकीजवळ, बाळे, सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदिवासी व्यक्तींच्या नावावर असलेल्या जमिनी आदिवासी व्यतिरिक्त इतर व्यक्तींना लिलावाशिवाय थेट खरेदी करता येत नाहीत. हे माहिती असतानाही अमर जाधव, यशवंत पाटील, राजेंद्र हजारे यांनी आदिवासी व्यक्तींच्या जमिनी कमी पैशात लिलावाद्वारे खरेदी करण्यासाठी कट रचला. अमृत पडवळे हे आदिवासी मागासवर्गीय समाजाचा आहे. हे जाधव व पाटील यांना माहित असल्यामुळे पडवळे यांना 2014 मध्ये प्रथम नोकरी लावतो. महिना 25 हजार रुपये देतो, कंपनीचा डायरेक्टर करतो, असे आमिष दाखवून त्यांनी कर्जत, डहाणू, चिंचलखैरे येथील आदिवासी व्यक्तींच्या जमिनी पडवळे यांच्या नावावर कमी पैशाने खरेदी केल्या.
या जमिनी त्यांना कमी पैशात लिलावाद्वारे खरेदी करता याव्यात, यासाठी येथील आदिवासी जमिनीवर पडवळेंच्या नावे कागदपत्रात चुकीच्या नोंदी नियमबाह्य व तातडीने करून 1 कोटी 10 लाख रुपयांचे जनकल्याण मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. सोलापूर या बँकेकडून कर्ज मंजूर करून घेतले. त्यानंतर या कर्जाची रक्कम बनावट विड्रॉल स्लिप व बनावट रक्कम हस्तांतरण पत्राच्या आधारे यशवंत पाटील यांच्या बँक खात्यात पडवळे यांच्या परस्पर जमा केली.
तसेच कर्जत येथील जमीन कमी पैशात लिलावाद्वारे विकत घेण्यासाठी हे कर्ज प्रकरण एनपीए करून त्याच्या अंमलबजावणीसाठी पडवळे यांना पनवेल दिवाणी न्यायालयाची नोटीस पाठविली. तसेच पडवळे यांनी न घेतलेले 1 कोटी 10 लाख रुपये कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी पडवळे यांच्यावर दडपण आणून पडवळे यांची फसवणूक केली. याप्रकरणी 12 मार्चरोजी सदर बझार पोलीस ठाण्यात जाधव, पाटील व हजारे यांच्याविरुध्द फसवणूक व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा