सोलापूर : मोहोळ तालुक्यात काश्मीरची सफरचंदे बहरली; पापरीतील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

सोलापूर : मोहोळ तालुक्यात काश्मीरची सफरचंदे बहरली; पापरीतील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
Published on
Updated on

पापरी, (सम्मेद शहा) : जम्मू काश्मीरमधील सफरचंदाची बाग आता पापरीमध्ये पाहावयास मिळत आहे. या बागेतील झाडांना फळे लागली असून त्यांचे वजन ५० ग्रॅमपासून २०० ग्रॅमपर्यंत असून उर्वरित झाडेही फुलोऱ्यात आहेत. पापरी (ता. मोहोळ) येथील बळीराम भोसले यांनी आपल्या शेतात प्रायोगिक तत्वावर सफरचंद शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. युट्युबसारख्या माध्यमाची मदत घेत दीड वर्षभरापूर्वी एक एकर क्षेत्रावर सफरचंदाची लागवड केली होती. मोहोळ तालुक्यातील सफरचंद बाग लागवडीचा हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. उत्तर प्रदेशमधील सहारानपूर नर्सरीमधून या सफरचंद रोपाची ऑनलाईन खरेदी करून लागवड करण्यात आली होती.

बाजारात बारमाही उपलब्ध तसेच शरीरास पौष्टिक असलेले सफरचंद फळ सर्वांनाच आवडते. सफरचंदाची झाडे, बागा म्हटल्या की आपल्या डोळ्यासमोर येतो, तो जम्मू-काश्मीरचा भाग पण आता मोहोळ तालुक्यातही सफरचंद बाग पाहावयास मिळत आहे. बळीराम भोसले यांनी आपल्या शेतीत हा नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे. या संदर्भात त्यांच्याशी 'दै पुढारी'ने संवाद साधला. ते म्हणाले की, यूट्यूबवर सफरचंदाची माहिती असलेले व्हिडिओ पाहिले. त्यामध्ये नागपूर, नाशिकमध्ये घरगुती परसबागेतही सफरचंदाची लागवड केल्याची माहिती मिळाली. मग मी रोपे कुठे मिळतात, त्यात कोणकोणत्या व्हरायटी आहेत, आपल्या भागात कोणती रोपे सूट होईल, याची माहिती शोधली. त्यावेळी उत्तर प्रदेशमधील सहारानपूर येथील सफरचंद रोपांची विक्री करणाऱ्या नर्सरीचा पत्ता मिळाला. तेथून रोपे मागवून घेतली.

एक एकर क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर सफरचंदाची लागवड केली. त्यानंतर दीड एकरात लागवड वाढविली. रोपांसाठी खत, पाणी व्यवस्थापन आपल्या इतर फळ बागांप्रमाणेच केल्याचे भोसले यांनी सांगितले. दरम्यान, भोसले आपल्या शेतीत सतत नविन प्रयोग करत असतात. त्यांनी शेतात मिरी, दालचीनी, फणस, काजू, जाम आदीचीही लागवड केली आहे. मोहोळ तालुक्यातील शेतकरी नवनवीन प्रयोग करतात. आता भोसले यांनी जम्मू काश्मीरमधील सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविल्याने कृषी क्षेत्रात मैलाचा दगड ठरला आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news