Sharad Pawar Explains Women Voters’ Role in NDA’s Landslide Victory:
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने 202 जागांवर विजय मिळवत निर्णायक बहुमत मिळवले, तर विरोधकांच्या महाआघाडीला फक्त 35 जागांवर समाधान मानावे लागले. या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
बिहारमध्ये एनडीएला एवढ्या मोठ्या फरकाने बहुमत कसे मिळाले, यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मतदानानंतर त्यांनी स्थानिक काही लोकांशी चर्चा केली. या चर्चेतून त्यांना कळले की महिलांनी मतदानात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि याचा परिणाम एनडीएच्या जागांवर झाला.
पवारांनी दावा केला की, महिलांना खात्यात 10 हजार रुपये जमा करण्याच्या सरकारी योजनेमुळे, त्यांच्यात सरकारबद्दल सकारात्मकता निर्माण झाली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले. याचा थेट फायदा एनडीएला झाल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे शरद पवारांनी महाराष्ट्रातील ‘लाडकी बहिण योजना’चा संदर्भ देत गंभीर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, “निवडणुकीच्या आधी सरकारी योजनांच्या माध्यमातून थेट नागरिकांच्या खात्यात पैसा टाकणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. हे थेट मतांवर परिणाम करणारे धोरण ठरत असेल, तर लोकशाहीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.”
त्यांनी निवडणूक आयोगालाही सांगितलं की, “अशा प्रकारे निवडणुकीच्या आधी निधीचे वितरण करणे योग्य आहे का, याचा गंभीर विचार आयोगाने करायला हवा. निवडणूक स्वच्छ, पारदर्शक आणि निष्पक्ष होणे गरजेचे आहे.”
महाआघाडीचा पराभव का झाला?
पवारांच्या मते, महाआघाडीला अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही, यामागे दोन कारणे दिसून येतात
महिलांचा मोठ्या प्रमाणातील मतदानाचा कल सत्ताधाऱ्यांकडे झुकलेला होता.
विरोधकांकडे स्पष्ट मेसेज आणि प्रभावी प्रचाराची कमतरता होती.