सातारा

सातारा : सातारचा प्रोजेक्ट आता राज्यात

सोनाली जाधव

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा शहरासह जिल्ह्यात मुली, युवती, महिला सुरक्षित व सक्षम व्हाव्यात यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून 'महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम' राबवल्यानंतर हाच उपक्रम संपूर्ण राज्यात सुरु करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात ना. अजित पवार यांनी केली. दरम्यान, अर्थसंकल्पात गृह, विधी व न्याय विभागासाठी 2478 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, सातारचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली 'महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम' सुरु आहे. शाळा, महाविद्यालयासह ठिकठिकाणी सातारा पोलिस दलाच्यावतीने उपक्रम सुरु आहेत. शाळकरी मुलींसाठी सातारा पोलिस शाळांमध्ये पोहचून 'पोलिस काका' मुलींना 'गुड टच, बॅड टच' याचे प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षकांद्वारे युवतींना पंच ब्लॉक, किक व पंच, पेन व लाठीच्या सहाय्याने हल्‍ला करणे व हल्‍ला झाल्यास रोखणे याचे प्रशिक्षण देण्यात आले. अशाप्रकारे छेड काढण्याचा त्यांच्यावर हल्‍ला करण्याचा प्रयत्न करणाचा प्रतिकार कसा करावा, याचे प्रात्यक्षिक दिले जात आहे.

समस्त महिला स्वसंरक्षणामध्ये आत्मनिर्भर व्हावे, असे टार्गेट पोलिस दलाने ठेवले. अनेक उदाहरणांमध्ये मुली, महिला निडरपणे पुढे येवून आवाज उठवत असल्याचे समोर आले आहे. कोरोना सारखी गंभीर परिस्थिती असतानाही हा उपक्रम ऑनलाईनद्वारे सुरु ठेवण्यात सातारा पोलिस दलाला यश आले. आतापर्यंत सातारा पोलिसांनी यासाठी प्रभावीपणे कार्यशाळा, प्रात्यक्षिके यावर भर देत जिल्ह्यातील लाखो विद्यार्थिंनींपर्यंत ते पोहचले. सहा महिन्यात हा प्रकल्प राबवताना त्याचा आराखडा तयार करुन प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली. साधरणपणे प्रतिमहिना त्याची मान्यवरांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. सातार्‍यात हा उपक्रम यशस्वी ठरल्याने राज्यात हा उपक्रम राबवण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात ना. अजित पवार यांनी केली आहे.

गृह, न्याय विभागाला 2478 कोटींचा निधी…

अर्थमंत्री ना.अजित पवार यांनी अर्थसंकल्पात गृह, न्याय व विधी विभागाला एकूण 2478 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यामध्ये राज्यात 18 अतिरीक्‍त न्यायालये, 24 जलदगती न्यायालये, 14 कुटुंब न्यायालये उभारली जाणार आहेत. कमांडो भत्यात वाढ करण्यात आली आहे. गडचिरोली येथे विशेषोपचार रुग्णालय स्थापन केले जाणार आहे. यासोबतच महिला सुरक्षा व उपक्रमाची घोषणा करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT