शिरवळमध्ये पोलिसांची विद्यार्थ्यांना बेदम मारहाण | पुढारी

शिरवळमध्ये पोलिसांची विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

नायगांव :  पुढारी वृत्तसेवा
शिरवळ, ता. खंडाळा येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याचे तीव्र पडसाद उमटले असून शुक्रवारी विद्यार्थ्यांनी कॉलेज गेट समोर आंदोलन छेडले. दरम्यान, विद्यार्थांना बेदम मारहाण करणार्‍या तीन पोलिसांसह एका होमगार्डला निलंबित करण्यात आले आहे.

शिरवळ पोलिस एन. डी. महांगरे, बी. सी. दिघे, चालक धायगुडे व होमगार्ड नरुटे अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.
मारहाणीची घटना बुधवारी रात्री घडली आहे. विद्यार्थी आरडाओरडा करत असल्याची तक्रार पेट्रोलिंग करणार्‍या पोलिसांकडे सोसायटीतील नागरिकांनी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गत काही दिवसांमध्ये शिरवळ परिसरात खून व चोर्‍याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पोलिसांनीही हा प्रकार गांभीर्याने घेतला. संबंधित ठिकाणी पोलिस गेले असता वसतीगृहाच्या टेरेसवर लाईट सुरू असलेली दिसली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या गाडीची लाईट बंद केली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या अंगावर टॉर्च मारले. यानंतर हे पोलिस टेरेसवर गेले. यावेळी विद्यार्थ्यांना पोलिसांनी विचारले असता विद्यार्थ्यांनी आम्ही अभ्यास व एनएनएस उपक्रमाचा अभ्यास करत असल्याचे सांगितले. यावरून विद्यार्थी व पोलिसांमध्ये वादावादी झाली. यावरून पोलिसांनी विद्यार्थ्यांना झोडपण्यास सुरुवात केली. दरवाजे, कड्या तोडून रूम मध्ये घुसून पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. यामुळे तब्बल 1 तास गोंधळ उडाला.याबाबत पशुवैद्यकीय महाविद्यालयावतीने तत्काळ पोलिस निरीक्षकांकडे मारहाण करणार्‍या पोलिसांविरोधात निवेदनही देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, पोलिसांनी वसतिगृहात घुसून कोणतीही विचारपूस न करता किंवा महाविद्यालय प्रमुखांना कोणतीही कल्पना न देता विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आहे. अश्‍लिल भाषेत शिवीगाळ केली आहे. त्यामुळे त्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्याचे पडसाद गुरूवारी उमटले.

ही घटना घडल्यानंतर गुरूवारी दिवसभर आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. मात्र, शुक्रवारी या घटनेचे पडसाद उमटले. सकाळी सकाळीच विद्यार्थ्यांनी मारकुट्या पोलिसांवर कारवाई करावी. यासाठी शिरवळ पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या गेट बाहेरच आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची धार वाढत गेली व राज्यात पाच ठिकाणी असलेल्या इतर पशु महाविद्यालयांमध्ये बंद पुकारण्यात आला. याचवेळी समाज माध्यमावर विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केलेल्याचे फोटो व्हायरल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस दलातील संबधित चौघांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर घटनेचे गांभीर्य पाहून तहसीलदार दशरथ काळे, पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, पोलिस उपनिरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिसांवर गुन्हा दाखल करा मगच आम्ही माघार घेवू, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.

यानंतर डीवायएसपी तानाजी बरडे यांनी या प्रकरणाची माहिती घेतली. याची महिती त्यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना दिली. घटना गंभीर असल्याने पोलिसांनी कोणत्याही प्रकारची माहिती न घेता मुलांना मारहाण केल्याने अजयकुमार बन्सल यांनी संबंधित पोलिसांना निलंबित केले.

Back to top button