खटाव (सातारा) : पुढारी वृत्तसेवा
पडळ (ता. खटाव) येथील साखर कारखान्यातील कामगाराच्या खूनप्रकरणी संशयित म्हणून अटकेत असलेले विधानपरिषदेचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना वर्षभरानंतर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला. घार्गेंना जामीन मिळाल्याचे वृत्त समजताच खटाव तालुक्यासह जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. दोन दिवसांत कागदोपत्री पूर्तता होऊन घार्गे यांची कारागृहातून सुटका होणार आहे.
एक वर्षापूर्वी 11 मार्च 2021 रोजी पडळ येथील केएम शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यातील एका कामगाराचा मारहाणीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे, को चेअरमन मनोज घोरपडे यांच्यासह काही जणांना अटक झाली होती. गेल्या वर्षभरात घार्गेंनी जामिनासाठी सत्र, जिल्हा आणि उच्च न्यायालयात प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना जामीन मिळाला नव्हता. सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांना सोमवारी सशर्तजामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती कारखान्याच्या संचालिका प्रिती घार्गे यांनी दिली. प्रभाकर घार्गेंना जामीन मिळाल्याचे वृत्त समजताच खटाव तालुक्यासह जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
घार्गे यांनी कारागृहातूनच सातारा जिल्हा बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून जिंकली होती. त्या निवडणुकीची जिल्हाभर चांगलीच चर्चा झाली होती. उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज माघारी घेणे आणि प्रत्यक्ष मतदानावेळीही अनेक नाट्यमय घडामोडी घडूनही घार्गेंनी सत्ताधारी राष्ट्रवादीविरोधात विजय मिळवला होता. त्यांची अटक होण्यात आणि जामीन न मिळण्यातही राजकारण होत असल्याच्या चर्चांना उत आला होता. आता घार्गेंना जामीन मिळाल्याने खटाव तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. घार्गेंच्या अटकेने आणि जामीन मिळण्यात होणार्या विलंबामुळे सुखावलेल्यांना आगामी काळात राजकीय पटलावर धक्के मिळणार असल्याचीही चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे.