सांगली: दारूच्या बिलावरून कुपवाड येथे दोघांवर प्राणघातक हल्ला | पुढारी

सांगली: दारूच्या बिलावरून कुपवाड येथे दोघांवर प्राणघातक हल्ला

सांगली पुढारी वृत्तसेवा : ‘दारूचे बिल का दिले नाही’, या कारणावरून राहुल श्रीरंग खांडेकर (वय 32, रा. अष्टविनायकनगर, 6 वी गल्ली, वारणाली) व त्याचा मित्र बिरू पुजारी या दोघांवर कोयत्याने वार करून जखमी करण्यात आले.

या प्रकरणी संशयित निलेश सरगर (रा. गारवा हॉटेल जवळ, कुपवाड) याच्या विरोधात जखमी खांडेकर यांनी कुपवाड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सरगर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार माधवनगर-मिरज रस्त्यालगत असलेल्या एका बारमध्ये रविवारी रात्री जखमी राहुल खांडेकर व त्याचा मित्र बिरू पुजारी हे दोघे दारू प्यायला गेले होते.

खांडेकर याने पिलेल्या दारूचे बिल दिले नाही. याचा मनात राग धरून संशयित निलेश याने खांडेकर व पुजारी यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले.

नीलेश याने हातात कोयता घेऊन ‘तुला जिवंत ठेवत नाही’, असे म्हणून खांडेकरचा पाठलाग केला. त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जोरात कोयत्याने वार करून जखमी केले.

या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जखमी खांडेकर याला मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. पुजारी याला सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. जखमी खांडेकर याने संशयित नीलेश सरगर याच्या विरोधात कुपवाड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सहाय्यक पोलिस फौजदार राजू बोंद्रे यांनी सरगर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button