सातारा

सातारा : पतसंस्थेतील 27 कोटीचे फ्रॉड प्रकरण; एकाला अटक

मोनिका क्षीरसागर

सातारा : पुढारी वृत्तसेवा
चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहाकारी पतसंस्था मर्यादित शाखा वडूज ता.खटाव येथे सुमारे 27 कोटी रुपयांच्या अपहाराच्या दाखल असलेल्या गुन्ह्यात गुरुवारी एकाला अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पाहताच पळून जाणार्‍या संशयिताला डोंगरात तांगडून पकडले.

प्रसाद भानुदास निकम (वय 29, मूळ रा.हिंगणी ता.खटाव) असे अटक केलेल्याचे नाव असून तो चैतन्य पतसंस्थेचा शाखा व्यवस्थापक आहे. याबाबत अधिक अशी, पतसंस्थेमध्ये अपहार झाल्याचे समोर आल्यानंतर वडूज पोलिस ठाण्यात याप्रकरणी 2019 मध्ये तब्बल 24 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आतापर्यंत संशयितावर कोणतीही कारवाई होत नव्हती. सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा तपास आहे.

या दाखल गुन्ह्यात पहिली अटक गेल्या महिन्यात झाली. संशयिताकडे तपास केल्यानंतर पोलिसांना लिंक लागत गेली. इतर संशयित आरोपींचा शोध घेत असताना बहुतेकजण पसार झाले आहेत. गुरुवारी पोलिस उपअधीक्षक मोहन शिंदे यांना एका संशयिताची माहिती मिळाली. त्यानुसार फौजदार अभिजीत भोसले, पोलिस हवालदार संकेत माने, शफीक शेख, प्रसाद जाधव या पोलिसांचे पथक संशयिताच्या शोधासाठी गेले. पोलिस पिंपळजाई ते तडवळे रस्त्यावर गेल्यानंतर तेथे क्रशर दिसले. पोलिस शोध घेत असतानाच संशयिताने तेथून धूम ठोकली.

संशयित पळून जात असल्याचे पाहून पोलिसांनी त्याचा थरारक पाठलाग केला. सुमारे 15 मिनिटांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याने प्रसाद निकम असे नाव असल्याचे सांगितले. तो शाखा व्यवस्थापक असल्याने त्याच्याकडे कसून चौकशी केली जाणार आहे. शुक्रवारी संशयिताला न्यायालयात हजर केले जाणार आहे. यामुळे आता आणखी कोणाला कोणाला अटक होणार? इतर संशयित कुठे आहेत? पोलिस जप्‍तीची मोहिम कधी राबवणार? असे सवाल उपस्थित झाले आहेत.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT