सातारा

सातारा : ट्रॅफिकच्या 24 पोलिसांची तडकाफडकी बदली

मोनिका क्षीरसागर

सातारा : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील महामार्गासह ठिकठिकाणी वाहतूक शाखेच्या पोलिसांचा भोंगळ कारभार सुरू असल्याचे वृत्त दै. 'पुढारी'ने 5 व 11 मे रोजी प्रसिद्ध केल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक यांनी तब्बल 24 पोलिस कर्मचार्‍यांना दणका दिला. संंबधितांची पोलिस मुख्यालयात बदली केली असून, हे सर्वजण 16 पोलिस ठाण्यांतील कर्मचारी आहेत. एसपींच्या या मेगा कारवाईने पोलिस दल हादरून गेले असून, जिल्ह्याचा वाहतूक विभाग त्यांच्या रडारवर असल्याचे अधोरेखित झाले आहे.

सातारा जिल्ह्यातून सुमारे 130 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग गेेला आहे. मात्र, दुर्दैवाने महामार्गासह जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. शनिवार, रविवारी तर महामार्गावरच तासभर वाहतूक ठप्प असते. यामुळे सर्वच प्रवाशांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. वाहतूक ठप्प होत असताना वाहतूक पोलिस मात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपलब्ध नाहीत. दिवसाचा कारवाईचा कोटा पूर्ण करायचा व निवांत रहायचे असे उद्योग ट्रॅफिक पोलिस करत असल्याचे वास्तव आहे. याबाबत दै.'पुढारी'ने दि. 5 मे रोजी 'महामार्ग जॅम..हायवे पोलिसांचे नाही ध्यान' व दि. 11 मे रोजी 'पोलिसांची अबू्र चव्हाट्यावर, कॅप्टन, त्यांना आणा वठणीवर' याद्वारे 'महामार्ग वाहतुकीचे तीनतेरा', असे वृत्त प्रसिध्द केले होते. या दोन्ही वृत्ताची एसपी अजयकुमार बन्सल यांनी गंभीर दखल घेतली.

प्राथमिक चौकशी केल्यानंतर जिल्ह्यातील बहुतेक वाहतूक पोलिसांचा रामभरोसे कारभार सुरु असल्याचे निदर्शनास आले.
कामचुकार व गंभीर चुका करणार्‍या वाहतूक पोलिसांचा अहवाल एसपी बन्सल यांनी मागवून घेतला. अहवालामध्येही चलन प्रक्रियेत चलन सबमिट न करता ते चलन रद्द करण्याचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट समोर आले. यामुळे संबंधित पोलिसांचा हेतू व वर्तणूक संशयास्पद आढळली. जिल्ह्यातील असे हे 24 पोलिस असल्याचे निश्‍चित झाले आहे.

शस्तभंगाची कारवाई सुरू…

जिल्ह्यातील 24 पोलिसांना कारवाईचे प्रेमपत्र गेल्यानंतर त्यांना तत्काळ पोलिस मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. शिस्तभंगविषयक कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. चौकशी ही नैसर्गिक न्यायतत्त्वावर होणार आहे. यामुळे पुढील आदेश होईपर्यंत संबंधित पोलिसांनी मुख्यालय सोडून कुठेही जाऊ नये, असे आदेश एसपी अजयकुमार बन्सल यांनी दिले आहेत.

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT