

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील दसरा चौकात 26 वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी करुन तिच्यावर कटरने हल्ला करण्यात आला. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. घटनेनंतर कटर घटनास्थळीच टाकून पसार झालेल्या हल्लेखोरास नागरिकांनी पाठलाग करुन पकडले.
संकेत राजगोंडा पाटील (वय 19, रा. वसगडे, ता. पलूस) असे हल्लेखोराचे नाव आहे. त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनीहल्ला व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
संकेत पाटील याची दसरा चौकातील महिलेशी ओळख होती. सोमवारी रात्री तो या महिलेकडे आला होता. ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने त्याला नकार दिला. यातून दोघांत जोरदार वाद झाला. यातून संकेतने खिशातील कटर काढून तिच्यावर हल्ला केला. छातीवर, गालावर व गळ्यावर सपासप वार केले. यामध्ये महिला गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर संकेतने पलायन केले. हा प्रकार पाहून काहीजणांनी विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली.
संकेत घटनास्थळीच कटर टाकून पसार झाला. परिसरातील नागरिकांनी त्याचा पाठलाग केला. काळ्या खणीजवळ त्याला पकडण्यात यश आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.