सातारा

सातारा : ‘किसनवीर’चा 5 लाख टन ऊस तुटणार

सोनाली जाधव

सातारा : हरीष पाटणे

किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 54 हजार शेतकरी सभासदांना न्याय देण्याच्या भूमिकेतून 'पुढारी'ने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला अखेर राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी साथ दिली आहे. साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांच्याशी सहकारमंत्र्यांनी चर्चा केली असून किसनवीर कार्यक्षेत्रातील शिल्‍लक 5 लाख टन ऊस तुटला पाहिजे, यासाठीचा मास्टर प्लॅन त्यांनी शेखर गायकवाड यांना दिला आहे. त्यानुसार 15 दिवस गळीत हंगाम लांबवण्याच्याही सूचना सहकारमंत्र्यांनी दिल्या असून 9 कारखान्यांच्या टोळ्या किसनवीर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात दिल्या जाणार आहेत. सोमवारी यासंदर्भात साखर आयुक्‍त कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

एकेकाळी देशात नावाजलेला किसनवीर सहकारी साखर कारखाना ढिसाळ नियोजनामुळे व बेबंदशाहीमुळे अडचणीत आला. कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. गोरगरीब शेतकर्‍यांची कोट्यवधी रुपयांची देणी थकीत
आहेत तर रखडलेला पगार व प्रलंबित देण्यांमुळे कामगार घायकुतीला आला आहे. एवढे सगळे संकट असतानाही या हंगामात सुमारे 5 लाख टन ऊस तसाच शिवारात तोडीवाचून उभा आहे. एकट्या वाई तालुक्यात सुमारे 3 लाख टन ऊस शिल्लक आहे. याबाबतचे गार्‍हाणे किसनवीर कार्यक्षेत्रातील सभासदांनी 'पुढारी'त येवून सांगितल्यानंतर कोणाचाही मुलाहिजा न बाळगता 'पुढारी'ने 54 हजार शेतकरी सभासदांचे हित समोर ठेवून रोखठोकच्या माध्यमातून जोरदार आवाज उठवला. केवळ किसनवीर कार्यक्षेत्रातीलच नव्हे तर जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेने 'पुढारी'च्या भूमिकेचे जोरदार स्वागत केले. किसनवीर कार्यक्षेत्रात तर उठावच झाला. शेतकर्‍यांनी जनआंदोलनाची भूमिका घेतली. विधानसभेत मात्‍तबर नेत्यांमध्ये रणकंदन होवूनही त्यात शिल्लक ऊस कसा तोडायचा? यावर कोणतेही भाष्य झाले नव्हते. 'पुढारी'ने नेमके वर्मावर बोट ठेवले. राजकीय साठमारी कोण चुकला? त्याचा हिशेब होईलच. पण आधी ऊस तोडा ही 'पुढारी'ची भूमिका शेतकर्‍यांना भावली. सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनीही हीच भूमिका उचलून धरली. त्यांनी सद्यस्थितीत ऊस तोडीचा प्रश्‍न प्राधान्याने मार्गी लावू. त्यासाठी कृतीयुक्‍त कार्यक्रम आखू, असे 'पुढारी'ला आवर्जुन सांगितले.

साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांच्याशी ना. बाळासाहेब पाटील यांनी चर्चा केली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. उसाच्या पट्टयात तोडीला आलेल्या टोळ्या होळीला माघारी जायला सुरूवात करत असतात. या टोळ्या गेल्या तर पुन्हा ऊस तोड होणे मोठे कठीण होवून जाते. त्यामुळे सहकार मंत्र्यांनी याबाबत साखर आयुक्‍तांना तातडीने बैठक लावण्याचे आदेश दिले आहेत. दि. 30 एप्रिलला यंदाच्या हंगामाची सांगता होणार होती. मात्र, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचा ऊस शिल्लक राहिल्याने हंगाम आणखी 15 दिवस वाढवण्याच्या सूचना ना. बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत.

यासंदर्भात 'पुढारी'शी बोलताना साखर आयुक्‍त शेखर गायकवाड म्हणाले, सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी किसनवीर संदर्भात उपयुक्‍त सूचना केल्या आहेत. त्यानुसार सध्याच्या घडीला अजिंक्यतारा, जरंडेश्‍वर, लोकनेते बाळासाहेब देसाई, दत्त इंडिया, न्यू फलटण, स्वराज, शरयू हे कारखाने किसनवीर कार्यक्षेत्रातील ऊस तोडून नेत आहेत. त्यांना अधिक क्षमतेने ऊस तोडून नेण्यासंदर्भात आपण सूचना दिल्या आहेत. किसनवीर कार्यक्षेत्रातील पूर्ण ऊस तोडून नेण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी ना. बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार सोमवारी साखर आयुक्‍त कार्यालयात महत्वाची बैठक होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील कारखानदारांना बोलावणे धाडले गेले आहे. पुढील महिन्याभरात कोणत्याही परिस्थितीत किसनवीरचा संपूर्ण ऊस तोडला जाईल याद‍ृष्टीने नियोजन सुरू आहे. जिल्ह्यातील 7 कारखान्यांशिवाय बारामतीचा सोमेेश्‍वर व कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर या कारखान्यांनाही किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस नेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांनी तयारी दर्शवली असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
'पुढारी'ने शेतकर्‍यांच्या दु:खाला वाचा फोडल्यानंतर सहकार मंत्र्यांनी तातडीने दखल घेवून ऊसतोडीसंदर्भात मास्टर प्लॅन केल्यामुळे किसनवीर कार्यक्षेत्रातील सभासदांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. जेव्हा शिवारातील संपूर्ण ऊस तुटून जाईल तेव्हा निश्‍चितपणे ऊस उत्पादक शेतकरी सहकार मंत्र्यांना धन्यवाद देतील. त्यामुळे सोमवारच्या बैठकीकडे शेतकर्‍यांच्या व जिल्ह्याच्या नजरा आहेत.

  • 'पुढारी'च्या रोखठोक भूमिकेला बाळासाहेबांची साथ
  • सोमवारी साखर आयुक्‍त कार्यालयात नियोजन बैठक
  • शेवटचे कांडे तुटेपर्यंत हंगाम बंद नाही
  • 54 हजार सभासदांना मिळणार दिलासा

किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शिल्लक ऊस तुटावा, यासाठी साखर आयुक्‍तांना मी सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांशीही याबाबत चर्चा झाली आहे. शेतकर्‍यांनी अजिबात घाबरून जाऊ नये. लगतच्या सर्व कारखान्यांना तसे प्लॅनिंग दिले आहे. सोमवारच्या बैठकीत साखर आयुक्‍त योग्य ती कृतियुक्‍त पावले उचलतील.
– ना. बाळासाहेब पाटील, सहकारमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT