सातारा

रामराजेंची विधानपरिषदेची हॅटट्रिक

Shambhuraj Pachindre

सातारा : पुढारी वृत्तसेवा सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर हे सोमवारी विधानपरिषदेवर सलग तिसर्‍यांदा विजयी झाले. हा विजय म्हणजे त्यांच्या विद्वत्तेचा, संयमाचा, अनुभवाचा व कुशल राजकीय रणनीतीचाच विजय समजला जात आहे.

विधान परिषदेत हॅटट्रिक करणारे रामराजे सलग सहाव्यांदा विधिमंडळात जाऊन पोहोचले आहेत. खा. शरद पवार यांचे अत्यंत विश्‍वासू असलेल्या रामराजेंच्या या विजयाने सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची आणखी मजबूत पकड निर्माण झाली आहे. दरम्यान, मोजणीदरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर जेव्हा निकाल बाहेर आला आणि त्यामध्ये ना. रामराजे ना. निंबाळकर यांच्या विजयाची घोषणा झाली तेव्हा सातारचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. अमोल मेटकरी व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पान 9 वर ना. रामराजे ना. निंबाळकर यांचे अभिनंदन करत आनंदोत्सव साजरा केला.

फलटणच्या राजघराण्याचे 29 वे वंशज व फलटण संस्थानचे अधिपती असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुण्यातील गरवारे कॉलेज व फर्ग्युसन कॉलेजमधून भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातून एमएसस्सी केले. त्यानंतर त्यांनी एलएलएम ही कायद्यातील पदवी मिळवली. 1991 मध्ये ते फलटण पालिकेचे नगराध्यक्ष झाले. 1995 मध्ये फलटण-खंडाळा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले.

राज्यातील अपक्ष 22 आमदारांना एकत्र करुन रामराजेंनी शिवसेनेचे नेते व तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. त्याच कालावधीत मुख्यमंत्री मनोहर जोशी व रामराजेंनी कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली. त्यामध्ये रामराजेंना कृष्णा खोर्‍याचे उपाध्यक्ष करण्यात आले होते. 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी रामराजेंनी राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते महसूल राज्यमंत्री झाले. 2004 मध्ये ते कॅबिनेट मंत्री व सातार्‍याचे पालकमंत्री झाले.

2013 मध्ये आ. शशिकांत शिंदे यांना मंत्रीपद देवून रामराजे यांच्या कारकीर्दीला ब्रेक दिला गेला. मात्र त्यावरुन सातारा जिल्ह्याच्या राष्ट्रवादीत जोरदार रान उठल्यानंतर लगेचच त्याच वर्षी 2013 मध्ये खा. शरद पवार यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद त्यांना दिले. मतदारसंघांच्या पुनर्रचनेत फलटण मतदारसंघ आरक्षित झाला. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामराजेंना विधान परिषदेवर संधी दिली. सलग सहा वर्षे ते विधान परिषदेचे सभापती आहेत.

आता पुन्हा तिसर्‍यांदा रामराजे विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. तर सलग सहाव्यांदा ते विधी मंडळात जावून पोहोचले आहेत. खा. शरद पवार यांच्या आशीर्वादामुळे रामराजेंचे नेतृत्व आणखी मजबूत झाले असून सातारा जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांची पकड घट्ट झाली आहे. खा. शरद पवार यांनी त्यांना पुन्हा विधान परिषदेचे सभापतीपद दिले तर राष्ट्रवादी काँग्रेसला पश्‍चिम महाराष्ट्रात त्यांचा फायदा होणार आहे. सलग सहाव्यांदा विधीमंडळात पोहोचलेल्या रामराजेंच्या ऐतिहासिक करिश्म्यामुळे त्यांच्या राजकीय रणनीतीचा महाराष्ट्रातही दबदबा निर्माण होणार आहे.

ना. रामराजे ना. निंबाळकर हे महाराष्ट्रात खा. शरद पवार यांचे विश्‍वासू मानले जातात. त्यामुळेच खा. शरद पवार यांनी त्यांना सलग तिसर्‍यांदा विधान परिषदेवर संधी दिली. सर्व पक्षीयांशी असलेल्या संबंधांचा रामराजेंना फायदा झाला आणि ते विधान परिषदेत भक्‍कम मतांनी विजयी झाले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT