सातारा

सातारा: नऊ बाजार समित्यांसाठी 29 जानेवारीला धुमशान

Shambhuraj Pachindre

सातारा : पुढारी वृत्तसेवा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील 281 बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील 9 बाजार समित्यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने या महिन्याच्या अखेरपासूनच कार्यवाही करण्यास सुरुवात होणार आहे. 29 जानेवारी 2023 ला मतदान व 30 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका रखडल्या होत्या. कोरोना संपल्यानंतर निवडणूक प्राधिकरणाने या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, सोसायट्यांच्या निवडणुका पूर्ण झाल्याशिवाय बाजारसमित्यांच्या निवडणुका घेवू नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत प्रथम सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे सहकार विभागाने प्रथम सोसायट्यांच्या निवडणुका उरकून घेतल्या. सध्याच्या घडीला राज्यातील सर्व सोसायट्यांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. बर्‍याच कालावधीत रखडलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्‍त डॉ. जगदीश पाटील यांनी घेतला. त्यानुसार बाजार समित्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

सातारा जिल्ह्यात 10 बाजार समित्या असून त्यातील दहिवडी बाजार समितीची निवडणूक झाली आहे. तर सातारा, कोरेगाव, वाई, फलटण, लोणंद, मेढा, वडूज, कराड, पाटण या बाजार समित्यांची निवडणूक लागली आहे. यासाठी बाजार समित्यांनी दि. 27 सप्टेंबरपर्यंत मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांकडे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.जुन्याच पद्धतीने होणार निवडणूक नव्या आलेल्या सरकारने बाजार समित्यांच्या निवडणुकीत 10 गुंठे क्षेत्र असणार्‍या शेतकर्‍यांनाही मतदान करण्याचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, निवडणूक कार्यक्रमानुसार विकास सेवा सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी, हमाल आणि मापाडी हेच मतदार असल्याचे सांगून तशी यादीही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयाला अधिकार्‍यांनी कोलदांडा दिला आहे. शेतकर्‍यांना मतदार का केले नाही, याचे कोडे मात्र उलगडलेले नाही. जुन्याच पद्धतीने निवडणूक होणार असल्याने इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मतदार यादी कार्यक्रम

मतदार यादी मागवणे 27 सप्टेंबर 2022
प्रारूप मतदार यादी तयार करणे 3 ते 31 ऑक्टोबर
प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी 14 नोव्हेंबर 2022
मतदार यादीवर हरकती 14 ते 23 नोव्हेंबर
हरकतींवर निर्णय 23 नोव्हें. ते 2 डिसें.
अंतिम मतदार यादी प्रसिद्धी 7 डिसेंबर

असा आहे निवडणूक कार्यक्रम

निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे 23 डिसेंबर 2022
उमेदवारी अर्ज दाखल करणे 23 ते 29 डिसेंबर
उमेदवार अर्ज छाननी 30 डिसेंबर 2022
वैध अर्ज प्रसिध्दी 2 जानेवारी 2023
उमेदवारी अर्ज मागे घेणे 2 ते 16 जानेवारी 2023
अंतिम उमेदवार यादी प्रसिध्दी 17 जानेवारी 2023
मतदान 29 जानेवारी 2023
मतमोजणी 30 जानेवारी 2023

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT